उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:16 IST2025-04-17T17:14:15+5:302025-04-17T17:16:55+5:30

Sambhaji Raje News: छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक व्हावे. रायगडाप्रमाणे इतर किल्ल्यांचे जतन व्हावे, संभाजीराजेंनी म्हटले आहे.

sambhaji raje supports udayanraje and uddhav thackeray demands over chhatrapati shivaji maharaj smarak in mumbai | उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”

उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”

Sambhaji Raje News: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक राजभवनावर बांधावे, असे मत उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. यानंतर नाशिक येथील निर्धार शिबिरात बोलताना उद्धव ठाकरे यांनीही राजभवनावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होण्याला पाठिंबा दर्शवला. यानंतर आता संभाजीराजे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मुंबईत राजभवनावर व्हावे, याला समर्थन दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीतच. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खरेच आदर वाटत असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत. राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा. राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास सांगणारे मोठे स्मारक तिथे उभे करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. यानंतर संभाजीराजेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

किल्ल्यांचे जतन संवर्धन आवश्यक आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक व्हावे. अरबी समुद्रात स्मारक करू म्हणतात. कुठेही करा, उदयनराजे किंवा उद्धव ठाकरे म्हणतात तसे राजभवनात करा. गडकोट किल्ल्यांचे संवर्धन व्हावे. रायगडाप्रमाणे इतर किल्ल्यांचे जतन व्हावे. आम्ही फोर्ट फेडरेशन काढतोय, २५ किल्ले आम्ही संवर्धित करणार आहोत. महाराजांच्या जिवंत स्मारकाचे अर्थात किल्ल्यांचे जतन संवर्धन आवश्यक आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, वाघ्या श्वानाच्या बाबतीत सविस्तर सांगितले आहे. कुठलाही इतिहास नसताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला दंतकथेतून निर्माण झालेले ते पात्र आहे. माझी मुख्यमंत्र्यासोबत या संदर्भात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्‍यांनी मला सांगितले की, लवकरच समिती स्थापन करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडला येणार, म्हणून हा विषय थांबवला होता. डेडलाईन कुठलीही नाही. दंतकथेतून तयार झालेला वाघ्या श्वान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणे चुकीच आहे. म्हणून सरकार माझ्या मागणीची दखल घेईल अशी अपेक्षा आहे, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: sambhaji raje supports udayanraje and uddhav thackeray demands over chhatrapati shivaji maharaj smarak in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.