"अभिनंदन बाबा..," संभाजीराजे छत्रपतींची शाहू महाराज छत्रपतींसाठी भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 07:57 PM2024-03-23T19:57:52+5:302024-03-23T19:59:38+5:30

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली.

Sambhaji Raje Chhatrapati shared emotional post for Shahu Maharaj Chhatrapati lok sabha kolhapur congress | "अभिनंदन बाबा..," संभाजीराजे छत्रपतींची शाहू महाराज छत्रपतींसाठी भावनिक पोस्ट

"अभिनंदन बाबा..," संभाजीराजे छत्रपतींची शाहू महाराज छत्रपतींसाठी भावनिक पोस्ट

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली. या मतदार संघातून काँग्रेस तब्बल २५ वर्षानंतर हात चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. महायुतीचा उमेदवार कोण याचा घोळ सुरु असताना काँग्रेसनं महाराष्ट्राच्या पहिल्याच यादीत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची घोषणा करून त्यांच्या उमेदवारीचा सन्मान केला. दरम्यान, यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या वडिलांना जिंकवून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचंही म्हटलं होतं. आता संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट करून दिली.
 

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
 

"अभिनंदन बाबा...गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या "वाकीघोल" या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेलं. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातलं काम... पुढे दिलेला शब्द.... आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचं ठरवलं. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
 


 

खरंतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचंच हे प्रमाण आहे. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे, असंही ते म्हणाले.

Web Title: Sambhaji Raje Chhatrapati shared emotional post for Shahu Maharaj Chhatrapati lok sabha kolhapur congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.