लोकसभा खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट २०२५) आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचे गंभीर आरोप केले. राहुल गांधींनी अनेक राज्यांतील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी राहुल गांधी हे सत्य बोलत असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातही मतांची चोरी झाली, असा आरोप केला आहे. शिवाय, भाजपला विरोध करणाऱ्यांनी एकत्र यावे, असेही त्यांनी इतर राजकीय पक्षांना आवाहन केले आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना अबू आझमी म्हणाले की, "भाजपला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र, यावे अशी माझी इच्छा आहे. भाजप सत्तेचा गैरफायदा घेऊन मतांची चोरी करत आहेत. हे खोट नाही तर, सत्य आहे. विधानसभेत माझ्या मतदारसंघात मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मतांची चोरी झाली. सहा महिन्यापूर्वी मतदान करणाऱ्या मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आणि त्याऐवजी त्यांच्या लोकांची नावे टाकण्यात आली. आपण कितीही आवाज उठवला तरी कोणीही ऐकणार नाही."
राहुल गांधींचा आरोपकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत फक्त पाच महिन्यांत मतदार नोंदणीत प्रचंड वाढ झाली. काही मतदारसंघांमध्ये तर मतदारांची संख्या स्थानिक लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा अनपेक्षित आणि संशयास्पद पराभव झाल्याचेही त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. "राहुल गांधी वारंवार खोटे आणि दिशाभूल करणारे वक्तव्य करत आहेत. आधी त्यांनी ७५ लाख मतदार वाढल्याचा आरोप केला होता, आणि आता तो आकडा १ लाखांवर आणला आहे. राहुल गांधी खोटे बोलून पराभव झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पक्षाचे अस्तित्व संपले आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. जनता त्यांना पुढच्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल", असेही ते म्हणाले.