तंबाखुमुक्तीला शाळांचा ‘सलाम’!

By Admin | Updated: February 1, 2015 02:49 IST2015-02-01T02:49:01+5:302015-02-01T02:49:01+5:30

राज्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्त विद्यार्थी मोहिमेला यश येत आहे. सलाम फाउंडेशनच्या प्रयत्नांनी राज्यातील ३२ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत.

'Salute' of tobacco to the schools! | तंबाखुमुक्तीला शाळांचा ‘सलाम’!

तंबाखुमुक्तीला शाळांचा ‘सलाम’!

राकेश जोशी - नाशिक
शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असतानाच आता आशेचा किरण दिसू लागला आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्त विद्यार्थी मोहिमेला यश येत आहे. सलाम फाउंडेशनच्या प्रयत्नांनी राज्यातील ३२ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत.
शालेय विद्यार्थी धूम्रपानासारख्या व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत़ १० ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे़ शाळकरी मुले व्यसनाकडे आकर्षित होत असतील, तर त्यांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यासाठी मुंबईतील सलाम फाउंडेशनने मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये २००३ पासून तंबाखूमुक्तीसाठी अभियान हाती घेतले आहे़ त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असले तरी एकमेव संस्थेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़
व्यसनमुक्ती मोहिमेंतर्गत शिक्षण विभागाशी चर्चा, विद्यार्थी, शिक्षकांना प्रशिक्षण, शिक्षण अधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि त्यानंतर व्यसनांचे दुष्परिणाम पटवून देण्यासाठी पोस्टर्स प्रदर्शन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे प्रयत्न केले जात आहेत़
सद्य:स्थितीत शाळांच्या १०० यार्ड परिसरात असलेल्या पानटपऱ्यांसह अन्य ठिकाणी सहज उपलब्ध होणारी तंबाखू हे एकमेव कारण या प्रयत्नांना खीळ घालत आहे. त्यामुळे विविध शाळांतील विद्यार्थिनींनी अशा टपरीचालकांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा उपक्रम राबविला़ तसेच त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा विकणार नाही, अशी शपथ घेतली.
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत़ मात्र, तरीही अनेक शाळांभोवती पानटपऱ्या सुरुअसल्याचे दिसून येते़ शिवाय, एमडीसारख्या अंमली पदार्थाची सर्रास विक्री होत असल्याचे नुकतेच ठाणे परिसरात उघडकीस आले आहे़ राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि अन्न व औषधी प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून शाळा परिसर तंबाखू मुक्त करण्याची गरज निर्माण झाली आहे़

 

Web Title: 'Salute' of tobacco to the schools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.