खारपाणपट्टय़ाचे मानव, पशुधन, शेतीवर परिणाम!
By Admin | Updated: December 7, 2015 02:50 IST2015-12-07T02:50:07+5:302015-12-07T02:50:07+5:30
खारपाणपट्टा संशोधन केंद्राचे भिजत घोंगडे.

खारपाणपट्टय़ाचे मानव, पशुधन, शेतीवर परिणाम!
राजरत्न सिरसाट/अकोला: पश्चिम विदर्भातील खारपाणपट्टय़ातील अतिशय अल्कधर्मी व खार्या पाण्याच्या सेवनामुळे या भागातील पशुधन आणि कोंबड्यांना गंभीर स्वरू पाचे आजार होत असल्याचे प्राथमिक संशोधनातून पुढे आले आहे. मानवाच्या आरोग्यावरही परिणाम होत असून, शेती कसणे कठीण झाले आहे; परंतु लोकप्रतिनिधी आणि शासन याकडे गांभीर्याने बघतत नसल्याने स्वतंत्र खारपाणपट्टय़ाचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे. पश्चिम विदर्भात ७५00 चौरस किमी क्षेत्रात पूर्णा नदी विस्तारली असून, या नदीच्या क्षेत्रातील चार हजार चौरस किमीवरील ८९४ गावे खारपाणपट्टय़ात मोडतात. या खारपाणपट्टय़ातील पाण्यात मिठाचे प्रमाण अधिक असल्याने पशू, पक्ष्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचा निष्कर्ष अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांनी अभ्यासाअंती मांडला आहे. खारे पाणी आणि मिठाची विषबाधा या दोहोंचा कोंबडीवर्गीय पक्ष्यांच्या पांढर्या पेशीच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले, तर पशुधनात यकृताचे आजार दिसून आले. चयापचनाच्या अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत. अमरावती जिल्हय़ातील दर्यापूर भागातील विद्यार्थी, शास्त्रज्ञांनी सर्वेक्षण करू न पशुधनाची माहिती गोळा केली आहे. या सर्वेक्षणात मुख्यत्वे उन्हाळ्यात पशूंमध्ये किडनीचे आजार दिसून आले आहेत. त्यांच्यामध्ये मिठाचे प्रमाण दुपटीने वाढल्याचेही निष्पन्न झाले आहे. जनावरांमध्ये पाण्यात विरघळलेले क्षार हे साधारणत: ५00 टीडीएस असतात. खारपाणपट्टय़ातील पशूंमध्ये हे प्रमाण ६000 टीडीएस म्हणजे दहापट दिसून आले आहे. यावर संशोधन करण्यासाठी अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेला स्वतंत्र संशोधन केंद्र देण्याची मागणी होत आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. खारपाणपट्टय़ासंदर्भात शासनाने वसुधाताई देशमुख यांच्या अध्यतेखाली समिती नेमली होती; पण त्यासंदर्भातही निश्चित धोरण काय, हे समोर आले नाही.