तिजोरी छोटी स्वप्ने मोठी !
By Admin | Updated: July 2, 2014 01:02 IST2014-07-02T01:02:56+5:302014-07-02T01:02:56+5:30
राज्य सरकारने जकात रद्द करीत एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केल्यामुळे महापालिकेची तिजोरी रिकामी असतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तब्बल १६४५ कोटी २७ लाख ६७ हजार

तिजोरी छोटी स्वप्ने मोठी !
१६४५ कोटींचे बजेट : ना करवाढ ना उत्पन्न वाढीचे पर्याय
नागपूर : राज्य सरकारने जकात रद्द करीत एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केल्यामुळे महापालिकेची तिजोरी रिकामी असतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तब्बल १६४५ कोटी २७ लाख ६७ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यावेळी त्यांनी तब्बल २४४ कोटींची भर घातली असली तरी, आगामी विधानसभा निवडणूक बघता जनतेवर कोणत्याही प्रकारचा नवा कर लादलेला नाही. मात्र, मनपाची रिकामी असलेली तिजोरी भरण्यासाठी विशेष काही असे उपायही सुचविलेले नाहीत. तिजोरीत पैसा नसतानाही विकासाचे स्वप्न रंगविण्यात आले आहे. बोरकर यांनी अर्थसंकल्पात १६४५.०२ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. सुरुवातीचे शिल्लक २५ लाख आहेत. ही रक्कम धरून एकूण १६४५.२७ कोटी रुपये जमा होतील. यातून १६४५.०८ कोटी रुपये वार्षिक खर्च होतील. शेवटी १८.९२ लाख रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज मांडला आहे.
फुटाळ्यावर देशातील सर्वात उंच झेंडा
देशाच्या हृदयस्थानी असलेल्या संत्रानगरीत दशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ व राष्ट्रध्वज लावण्याची योजना महापालिका प्रशासनाने तयार केली आहे. फुटाळा तलावावर २९० फूट उंच राष्ट्रीय स्तंभ व राष्ट्रध्वज राहील. देशभक्तीच्या भावनेने हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. हा प्रकल्प युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असून, जागतिक स्तरावर नागपूरला एक वेगळी ओळख मिळवून देणारा आहे.
१४ नवी उद्याने
महापालिकेतर्फे शहरात १४ नवी उद्याने उभारली जातील. यासाठी ४.७५ कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नासुप्रने ३ मोठे व २६ लहान उद्यानांची देखभाल करण्यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. या उद्यानांचाही महापालिका विकास करेल. ‘ लोकमत’ने शहरातील महापालिकेच्या उद्यानांच्या दूरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘ सांगा, कसे खेळायचे’ ? ही वृत्तमालिका प्रकाशित केली होती. या मालिकेवर नागरिकांनी समाधान व्यक्त करीत नगरसेवक व प्रशासनावरही दबाव निर्माण केला होता. शेवटी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांनाही ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घ्यावी लागली.