मुंबई - एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार निशाणा साधत शिवसेनेतून आता घाण निघून गेली, आता सगळं चांगलंच होणार असं वक्तव्य केलं होतं. शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं होतं. यावरून माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आदित्य ठाकरेंना (Shivsena Aaditya Thackeray) टोला लगावला आहे.
तुमच्या बुद्धीची कीव येते असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "पर्यावरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते राज्यात कोठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तुम्ही घरातल्या सोन्यासारख्या माणसांना गमावणे याला घाण स्वच्छ करणे म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव येते... विनाशकाले विपरीत बुद्धी!" असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी गेले अनेक वर्ष आपण शिवसेना म्हणून एकत्र आहोत, कोणाचा डोळा असला तरी मुंबईला कोणाची नजर लागू दिली नाही. ज्यांनी सभागृहात ताकद दाखवली ते आज आमच्यासोबत आहेत. गेले दोन चार दिवस जे वातावरण आहे, त्यावरून एकच दिसतंय आता घाण निघून गेली, जे काही व्हायचं ते चांगलंच होणार, असं म्हटलं होतं. एकाच गोष्टीचं मला आश्चर्य होतं, राजकारण म्हटल्यावर लोकं कसं बदलू शकतात हे पाहिलंच आहे. पण हाच प्रश्न येतो आम्ही यांना काय कमी दिलं. कालही माझ्याकडे अनेक लोकं आले त्यांनी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही असं सांगितल्याचंही ते म्हणाले.
कोविडच्या कठिण काळात महाराष्ट्राला दिशा देणारा, सर्वांची काळजी घेणारा, घरातला नाव घेणारा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाव प्रसिद्ध झाले आहे. ग्लासगोला जाताना त्यांनी सर्जरी होती तेव्हाही त्यांनी मला थांबवलं नाही. त्या ठिकाणीही त्यांचं कौतुक करण्यात आलं. राज्यासाठी आम्ही ८० हजार कोटींचे करार केले, पण आपल्याला विकण्यासाठी करार केले नाही, असंही त्यांनी नमूद केलं होतं
विधान परिषदेसाठी सचिन अहिर यांना शब्द दिलाय तो पाळणार म्हणजे पाळणार. प्रत्येक शिवसैनिकाला जो शब्द दिलाय तो मी पाळणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज्यसभेसाठी राऊत यांना पाठवायचे आहे, पण संजय पवार हे सामान्य शिवसैनिक आहे. सामान्य कार्यकर्त्यांनाही आम्ही संधी दिली आहे. वर्षा बंगल्याचा आम्हाला मोह नाही. बाकीच्यांचं माहित नाही. फेसबुक लाईव्हला उशीर झाला तेव्हा त्या काळात त्यांनी आपल्याला बॅगा भरा असं सांगितलं. असा मुख्यमंत्री पुन्हा मिळणार नाही, असंही ते म्हणाले होते.