गोवारींचे बलिदान व्यर्थ जाणार नाही
By Admin | Updated: November 24, 2014 01:20 IST2014-11-24T01:20:52+5:302014-11-24T01:20:52+5:30
उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना १९९४ साली याच दिवशी याच ठिकाणी ११४ गोवारी बांधव शहीद झाले. लोकशाहीत तो काळा दिवस आला नसता तर बरे झाले असते.

गोवारींचे बलिदान व्यर्थ जाणार नाही
शहीद गोवारींना आदरांजली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
नागपूर : उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना १९९४ साली याच दिवशी याच ठिकाणी ११४ गोवारी बांधव शहीद झाले. लोकशाहीत तो काळा दिवस आला नसता तर बरे झाले असते. इतकी वर्षे उलटल्यावर आजही परिस्थितीत बदल नाही. शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या गोवारी समाज मागासलेला आहे. त्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरूच आहे. गोवारींचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. समाजाला न्याय देण्यासाठी राज्य सरकार तातडीने मार्ग काढेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
गोवारी शहीद दिनानिमित्त झिरो माईलवरील शहीद गोवारींच्या स्मारकाला देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभिवादन के ल्यानंतर आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. गोवारी समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांच्या मागण्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती, जमातीला संविधानाच्या माध्यमातून शक्ती दिली. त्याचा योग्य उपयोग व्हावा, या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.
केंद्र व राज्य सरकार गोवारींच्या पाठिशी
२३ नोव्हेंबर १९९४ हा इतिहासातील काळा दिवस होता. या घटनेच्या आठवणीने आजही डोळ्यात अश्रू येतात. ११४ शहिदांच्या स्मृतीदिनी समाजाला पुढे नेण्याचा संकल्प करा. न्याय देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार समाजाच्या पाठिशी उभे असल्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली. गोवारींचा विकास होण्यासाठी समाजाचा शैक्षणिक, सामाजिक विकास होणे गरजेचे आहे. गरिबी व बेरोजगारी दूर व्हावी यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. व्यवसायावर आधारित कौशल्य प्रशिक्षणासाठी केंद्र सरकारने २००० कोटींची तरतूद केली आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सरकार मदत करणार आहेच. परंतु यासाठी लोकांनीही पुढे यावे असे आवाहन गडकरी यांनी केले.
गोवारींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मुख्मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीमागे उभे राहील, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. व्यासपीठावर आमदार, गोवारी समाजाचे नेते व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहिदांना मान्यवरांची आदरांजली
शहीद गोवारी स्मृतिदिनानिमित्ताने झिरोमाईल येथील शहीद स्मारकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, अनिल बोंडे, अनिल सोले, विकास कुंभारे,सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, सुधीर पारवे, नाना श्यामकुळे, आशिष देशमुख, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपा आयुक्त श्याम वर्धने, गिरीश व्यास, संदीप जोशी, अविनाश ठाकरे, राजेश बागडी, श्रीकांत देशपांडे,चेतना टांक, जयकुमार वर्मा, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे, प्रमोद पेंडके यांच्यासह विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आदरांजली वाहिली.
११४ अस्थिकलशांची रॅली
शहीद गोवारींच्या स्मृतीनिमित्त आदिवासी सेनेने ११४ अस्थिकलशांची रॅली काढली. शहीद स्मारकावर आदरांजली वाहिली. प्रत्येक अस्थिकलशावर शहिदाचे नाव व पत्ता लिहिलेला होता. संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच स्मारकाच्या ठिकाणी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
राष्ट्रवादीतर्फे आदरांजली
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील, राजेश कुंभलकर यांच्यासह पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी गोवारी शहीद स्मारकावर जाऊन शहिदांना आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)
गडकरी-फडणवीस यांच्यात चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यावर त्यांची भेट घेऊन चर्चा केली. नंतर एकाच गाडीतून ते झिरोमाईल येथील गोवारी शहीद स्मारकावर अभिवादन करण्यासाठी आले. कशाविषयी चर्चा झाली अशी पत्रकारांनी विचारणा केली असता, गडकरींची भेट घ्यायला कोणतेही कारण लागत नाही. अशी चर्चा होतच असते, असे सांगून माहिती देण्याचे फडणवीस यांनी टाळले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात फडणवीस व गडकरी यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आदरांजलीसाठी गोवारी बांधवांची गर्दी
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी काढलेल्या मोर्चात चेंगराचेंगरी होऊ न ११४ गोवारी बांधवांचे बळी गेले. रविवारी स्मृतिदिनानिमित्ताने शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी शहिदांच्या कु टुंबीयासह राज्यभरातून आलेल्या गोवारी बांधवांची स्मृती स्मारकावर गर्दी होती. या घटनेला २० वर्षे पूर्ण झाली. आजही त्या आठवणी ताज्या आहेत. आदरांजली वाहताना शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दाटून आल्या.