धावत्या रेल्वेत ढेकूण, उंदरांचा उपद्र्रव
By Admin | Updated: February 2, 2015 00:27 IST2015-02-01T23:45:20+5:302015-02-02T00:27:26+5:30
प्रवासी हैराण : रेल्वे प्रशासनाचे स्वच्छतेबाबत दुर्लक्ष; आंदोलन उभारणार

धावत्या रेल्वेत ढेकूण, उंदरांचा उपद्र्रव
मिरज : रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांतील सफाईकडे मात्र दुर्लक्ष केल्यामुळे धावत्या रेल्वेत ढेकूण व उंदीर प्रवाशांना हैराण करीत आहेत. स्वच्छतेचा ठेका खासगी ठेकेदारांकडे सोपविण्यात आल्यापासून रेल्वेच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्यामुळे प्रवाशांना उपद्रव सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ रेल्वे प्रवासी संघटना आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या अनेक एक्स्प्रेसमध्ये ढेकणांचा उपद्रव वाढला आहे. आरक्षित वातानुकूलित व सर्वसाधारण डब्यांची स्वच्छता व कीटकनाशकांवरील उपाययोजनांकडे दुर्लक्ष असल्याने रेल्वेचे डबे म्हणजे ढेकूण, उंदीर, झुरळ व कीटकांच्या आश्रयाचे ठिकाणच बनले आहेत. रेल्वेचे डबे दर तीन महिन्यांनी पेस्ट कंट्रोल करण्याचा नियम आहे. मात्र रेल्वे डब्यांच्या स्वच्छतेचे काम खासगी ठेकेदाराकडे सोपविण्यात आल्याने पेस्ट कंट्रोलचे काम वेळेवर होत नाही. रेल्वेच्या जुन्या डब्यांमधील आसनांमध्ये काथ्याचा वापर करण्यात आल्याने अशी आसन व्यवस्था ढेकणांसाठी आश्रयस्थान बनली आहे. कीटकनाशक फवारणीनंतरही या ढेकणांचे नियंत्रण होत नसल्याने प्रवासी ढेकणांसोबतच प्रवास करीत आहेत. जोधपूर-धनबाद या मिरजेतून जाणाऱ्या एक्स्प्रेसचे वातानुकूलित डबे ढेकणांसाठी बदनाम आहेत. जोधपूर एक्स्प्रेसच्या एका वातानुकूलित डब्यातील ढेकणांचे नियंत्रण होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी हा डबा बदलण्यात आला. वातानुकूलित डब्याप्रमाणे आरक्षित व सर्वसाधारण डब्यांमध्येही ढेकणांचा मुक्तसंचार आहे. मिरजेतून येणाऱ्या-जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेमधील प्रवासीही ढेकणांचा सामना करीत आहेत. तसेच रेल्वे प्रवासी सोबत खाद्यपदार्थ घेऊन प्रवास करीत असल्याने रेल्वे डब्यात उंदरांचाही सुळसुळाट वाढला आहे. मात्र तक्रार येईल तेथेच ढेकूण व उंदरांच्या नियंत्रणाची तात्पुरती उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र सर्वच रेल्वेगाड्यांत त्यांचा फैलाव होत आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी भोजन तयार करण्यासाठी असलेल्या पॅन्ट्री कारमधील अन्नपदार्थांच्या साठ्यामुळे उंदीर मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.ढेकूण व उंदारामुळे प्रवासी त्रस्त झाल्याने काही जणांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरविली आहे. रेल्वेमध्ये औषध फवारणी करावी, अशीही मागणी प्रवासीकडून होत आहे. वातानुकूलित व आरक्षित डब्यांतील महागडे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ढेकूण व उंदीर चांगलाच मनस्ताप देत आहेत. (वार्ताहर)
ढेकणांच्या त्रासामुळे रेल्वे रोखली...
सहा महिन्यांपूर्वी अजमेर एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात ढेकणांच्या त्रासामुळे प्रवाशांनी हुबळी स्थानकात ही एक्स्प्रेस रोखली होती. प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अजमेर एक्स्प्रेसची वातानुकूलित बोगी बदलण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका लोकप्रतिनिधीने ढेकणांच्या त्रासामुळे रेल्वे प्रवासच रद्द केल्याची घटना घडली.
ठेकेदारांमध्ये समन्वयाचा अभाव
रेल्वेतील स्वच्छतेचे काम वेगवेगळ्या ठेकेदारांवर सोपविण्यात आले आहे. स्थानकातील स्वच्छतेचे काम एकाकडे, रेल्वेची फेरी पूर्ण झाल्यानंतर सर्व डबे धुऊन स्वच्छ करण्याचे दुसऱ्याकडे, तर धावत्या रेल्वेची स्वच्छता ठेकेदाराकडे आहे. ठेकेदारांची संख्या जास्त व त्यांच्यात समन्वय नसल्याने रेल्वेतील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. रेल्वेत व रेल्वे स्थानकात अस्वच्छता करणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. मात्र रेल्वेचे डबे स्वच्छ ठेवण्याबाबत मात्र रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.