स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी धावले कळंबोलीकर
By Admin | Updated: August 15, 2016 03:43 IST2016-08-15T03:43:25+5:302016-08-15T03:43:25+5:30
स्वच्छ शहर... सुंदर शहराचा संकल्प करीत कळंबोलीवासीयांनी रविवारी धाव घेतली.

स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी धावले कळंबोलीकर
कळंबोली : स्वच्छ शहर... सुंदर शहराचा संकल्प करीत कळंबोलीवासीयांनी रविवारी धाव घेतली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साई प्रतिष्ठान व कळंबोली साई सेवा संस्थेच्या वतीने ‘एक धाव स्वच्छते’साठी या मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. याला विद्यार्थी, रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोकमत या मॅरेथॉनचे माध्यम प्रायोजक होते.
सध्या देशात स्वच्छ भारत अभियान जोरात सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. स्थानिक पातळीवर स्वच्छतेचा जागर व्हावा याकरिता कळंबोली साईभक्त सेवा संस्था व साई प्रतिष्ठानने पुढाकार घेतला होता. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉनला सकाळी ७ वाजता करवली चौकात आमदार प्रशांत ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. करवली चौकातून रोडपाली येथील पल्लवी हॉटेल येथून वळण घेऊन पुन्हा त्याच चौकात सांगता झाली. एकूण तीन कि.मी. अंतराची ही धाव होती. ८ ते १२ आणि १३ वर्षांपुढील खुला गट त्याचबरोबर अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकरिता स्वतंत्र गट पाडण्यात आले होते. आयोजकांच्या वतीने प्रथम तीन विजेत्यांना पदक व उत्तेजनार्थ पारितोषिक असे ४८ बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
मॅरेथॉनकरिता शाळा आणि महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कळंबोलीत साई प्रतिष्ठान आणि कळंबोली साई भक्त सेवा संस्थेच्या वतीने ‘स्वच्छतेकरिता एक धाव’ ही मिनी मॅरेथॉन आयोजिन केली. मॅरेथॉनच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करण्यात आला, ही बाब कौतुकास्पद आहे. आपले घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवले जाते त्याचप्रमाणे परिसर व शहर स्वच्छ ठेवण्याकरिता सगळ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. मॅरेथॉनकरिता शिवबा व रण स्वराज्य ढोल-ताशा पथक कळंबोली, प्रदीप स्पोर्ट्स, निखील येवले पाटील, गिरीश धुमाळ, गीता नाईक, नीलम मसुकर, भूमी पांचाळ, निशा पाटील, विलास पाटील, निखील शिंदे, जितेश साळुंके, मयूर वाळके, प्रवीण म्हात्रे, संजय गावंड, मनोज जाधव यांनी सहकार्य केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष नितीन काळे, कार्याध्यक्ष संदेश पाटील, वीरेंद्र पाटील, गणेश कारंडे, जितेश कुडाळकर, दत्ता ठाकूर, हेमंत हिरे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
>मॅरेथॉनमध्ये घडले
सामाजिक बांधिलकीचे दर्शन
‘स्वच्छतेकरिता एक धाव’ या मॅरेथॉनमध्ये सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. संकल्प हेमंत कुमार हा साडेतीन वर्षांचा मुलगा पॅलेसिनिया या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावर शस्त्रक्रि या करण्याकरिता श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पन्नास हजारांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर शिवाबा ढोल-ताशा पथकाने वर्षभरात होणारी कमाई संकल्पला मदत म्हणून देण्याचा संकल्प केला.