‘एक्सप्रेस वे’वर नियमांना हरताळ

By admin | Published: April 21, 2016 01:00 AM2016-04-21T01:00:46+5:302016-04-21T01:00:46+5:30

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अवजड वाहनचालकांकडून पदोपदी वाहतूक नियम व लेनच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहणीत आढळून आले

Rule of rules on 'Express Way' | ‘एक्सप्रेस वे’वर नियमांना हरताळ

‘एक्सप्रेस वे’वर नियमांना हरताळ

Next

विशाल विकारी,  लोणावळा
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अवजड वाहनचालकांकडून पदोपदी वाहतूक नियम व लेनच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहणीत आढळून आले. महामार्ग पोलिसांनी एक्सप्रेस हायवेवर १५ एप्रिलपासून लेन कटिंग करणाऱ्या अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. पाच दिवसांत या मार्गावर ७५ हजारांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
मात्र, पदोपदी वाहनचालक लेनच्या नियमांचा भंग करीत सर्रास पहिल्या व दुसऱ्या लेनमधून वाहने भरधावपणे दामटत असल्याचे दिसून आले. नियम मोडणाऱ्यांमध्ये एसटी महामंडळ व खासगी प्रवासी बसचे प्रमाण सर्वाधिक आढळले. यासह मल्टिअ‍ॅक्सल कंटेनर, मालवाहू ट्रक हे देखील सर्रास मधल्या लेनमधून प्रवास करताना आढळले. महामार्गावर जागोजागी लेनचे नियम सांगणारे बोर्ड लावण्यात आले आहेत.
मात्र वेगाशी स्पर्धा करीत वाहन चालविणारे चालक या नियमांकडे सर्रास काणाडोळा करीत आहेत. महामार्ग पोलिसांच्या सहा तुकड्या या कारवाई मोहिमेत सक्रिय आहेत. मात्र ९४ किमी अंतराच्या या मार्गावर व लेनच्या नियमांवर लक्ष ठेवणे या सहा पथकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी लेनची शिस्त मोडणाऱ्या वाहनांचे ते चित्रीकरण करीत आहेत. मात्र, उर्वरित ठिकाणांचे काय? पोलीस नसलेल्या ठिकाणांवर सर्रास नियम मोडले जात आहेत. खंडाळा बोरघाटात खालापूर टोलनाका ते खंडाळा बोगदा दरम्यान वाहतूक नियमांचे बिनदिक्कतपणे उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळाले. अवजड वाहने मिळेल त्या लेनमधून घाट चढत होती .
मुंबईकडे जाणारी वाहनेदेखील जी लेन मोकळी दिसेल, तेथून गाड्या भरधाव पळविताना दिसत होती. एकीकडे लेनचे नियम मोडले म्हणून दंड आकारणी सुरू असताना दुसरीकडे लेनचे नियम मोडण्याची वाहनचालकांची जणू स्पर्धा सुरू होती. वाहनचालकांची मानसिकता हे या मागचे मोठे कारण आहे. वाहनचालकांची मानसिकता बदलल्याशिवाय नियम परिणामकारक होणार नाहीत. तसेच दंडाची रक्कम नगण्य असल्याने त्या दंडाचा वाहनचालकांवर परिणाम होत नाही.
ही दंडाची रक्कमदेखील वाढविण्याची गरज आहे.महामार्गावर निमयांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवत त्याद्वारे वाहनांचे चित्रीकरण व कारवाई केल्यास ती अधिक प्रभावी ठरू शकते. संपूर्ण महामार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत येऊन काही दुर्घटना घडल्यास तातडीने तेथे मदत पोहचू शकते. या दृष्टीने महाराष्ट्र शासन व रस्ते विकास महामंडळ यांनी विचार करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
सीसीटीव्हीची आवश्यकता
४महामार्गावर
निमयांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्याद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी.
४त्यामुळे लेनकटिंगचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण
महामार्ग सीसीटीव्हीच्या
कक्षेत येऊन काही दुर्घटना घडल्यास तातडीने तेथे मदत पोहचू शकते. प्रशासनाने याबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Web Title: Rule of rules on 'Express Way'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.