रुबी रुग्णालय पुन्हा अडचणीत
By Admin | Updated: April 28, 2017 03:37 IST2017-04-28T03:37:38+5:302017-04-28T03:37:45+5:30
घाटकोपर येथील रुबी डायग्नॉस्टिक सेंटरवर अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी छापा टाकला.

रुबी रुग्णालय पुन्हा अडचणीत
मुंबई : घाटकोपर येथील रुबी डायग्नॉस्टिक सेंटरवर अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी छापा टाकला. या वेळी येथे गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि शेड्यूल एच-१मध्ये मोडणाऱ्या एमटीपी किट्सचा अवैध साठा जप्त करण्यात आला. एमटीपी किटच्या खरेदी-विक्रीची कोणतीही नोंद या ठिकाणी आढळली नाही. तसेच, या ठिकाणी ११ एमटीपी किट्स आणि १५ एमटीपी किट्सची वापरलेली पाकिटे आढळली.
घाटकोपर येथील रुबी रुग्णालयाविषयी गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्याआधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने या रुग्णालयावर छापा टाकला. रात्री २ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सविता चव्हाण (आयुर्वेदिक, एम.डी.) या रुग्णालयाच्या मालक असून, तेथे कामही करतात. कारवाईदरम्यान, गर्भपातासाठीच्या एमटीपी किट्सचा साठा सापडला. त्याचा बेकायदा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयातील वेदांत औषधांच्या दुकानातून ७० हजारांची औषधेही जप्त करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाने या रुग्णालयावर औषध, सौंदर्य प्रशासन कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे. लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)