नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:04 IST2025-09-22T18:03:56+5:302025-09-22T18:04:54+5:30

RSS Reaction On Nepal Gen Z Protest: संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे.

rss spokesperson sunil ambekar reaction on nepal gen z protest | नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

RSS Reaction On Nepal Gen Z Protest: संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे.  या उपक्रमाच्या माध्यमातून हिंदू समाजात जागरूकता आणि सशक्तीकरण यावर भर दिला जाणार आहे. विजयादशमी दिनाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय बाल स्वयंसेवकांचे स्वतंत्र पथसंचलनही आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.

देशभरात सध्या संघाच्या सुमारे ८३ हजार शाखा नियमितपणे कार्यरत आहेत. याखेरीज आठवड्यातून एकदा होणाऱ्या ३२ हजार बैठकांद्वारे संघाची वैचारिक आणि सामाजिक चळवळ अधिक बळकट होत आहे, असे सुनील आंबेकर यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी नेपाळमध्ये झालेल्या ‘Gen Z’ आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. 

हिंदू समाज संघटित व सजग होणे आवश्यक

हिंदू समाजाचे सशक्तीकरण हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर त्यामागे संपूर्ण जगाला दु:खातून मुक्त करण्याचा दृष्टिकोन आहे. जगभरात जे षड्यंत्र चालू आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदू समाज संघटित व सजग होणे आवश्यक आहे, असे सुनील आंबेकर यासंदर्भात बोलताना म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयावर बोलताना आंबेकर म्हणाले की, संघ आणि स्वयंसेवक भारताच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत. आमचा उद्देश भारताला सशक्त करण्याचा आहे की, कोणत्याही देशात किंवा समाजात संकट उद्भवू नयेत. जगातील कोणताही समाज दु:खात राहू नये, यासाठी प्रयत्नशील राहणे ही संघाची दिशा आहे. संघाचे प्रयत्न हे भारताला आत्मनिर्भर व सक्षम करण्याचे आहेत, जेणेकरून कोणत्याही बाह्य दबावाचा फारसा परिणाम होणार नाही.

 

Web Title: rss spokesperson sunil ambekar reaction on nepal gen z protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.