आर.आर. पाटील १०० मीटर तरी पळतील का - राज ठाकरे
By Admin | Updated: June 15, 2014 18:15 IST2014-06-15T18:13:33+5:302014-06-15T18:15:56+5:30
पोलिस भरतीमध्ये धावण्यासाठी तरुणांना ५ किलोमीटरचे अंतर दिले जात असले तरी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील १०० मीटर तरी पळतील का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
_ns.jpg)
आर.आर. पाटील १०० मीटर तरी पळतील का - राज ठाकरे
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १५- पोलिस भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुण मुंबईत येतात. एसटीने मुंबई गाठणारी ही मुलं उपाशी पोटी असतात. अशा स्थितीत या तरुणांना धावण्यासाठी ५ किलोमीटरचे अंतर ठेवले जाते. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील १०० मीटर तरी पळू शकतील असा खोचक सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. पोलिस भरती मुंबईत घेण्याऐवजी जिल्हा जिल्ह्यात का घेतली जात नाही असा सवालही त्यांनी गृहमंत्रालयाला विचारला आहे.
आमदार प्रवीण दरेकर यांच्या विधानसभेतील भाषणांचे 'राजगर्जना' हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. रविवारी बोरिवलीत मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. या प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरेंनी पोलिस भरतीवरुन गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली. पोलिस भरतीसाठी आलेले तरुण धावल्याने मृत्यूमुखी पडतात ही दुर्दैवी घटना आहे. पोलिस भरतीतील जाचक नियम बदलण्याची गरज असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. आर. आर. पाटलांना खाकीतील पोस्टमन आणि पोलिस यातील फरकच कळत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ
विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. राज ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याबाबत कमालीची उत्सुकता आहे. याविषयी ठाकरे म्हणाले, २८८ पैकी एकही मतदार संघ माझा नसून महाराष्ट्र राज्य हाच माझा मतदारसंघ आहे. मला फक्त आमदार होण्यात रस नसून मला महाराष्ट्राचा विकास घडवायचा आहे. जुलै- ऑगस्टमध्ये मी राज्याची विकास योजना जनतेसमोर मांडणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेत्यांनी काळानुसार बदलावे
विधानसभा ही जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची जागा आहे. मोजक्या शब्दात प्रश्न मांडून त्यावर मोजक्या शब्दात उत्तर देऊन जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने विधानसभेत काही नेते लांबच लांब भाषण करतात. त्यामुळे वेळ खर्ची होतो अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. नेत्यांनी काळानुसार बदलणे गरजेचे असून त्यासाठी भाषा सुधरवावी असा सल्लाही त्यांनी पक्षातील आमदारांना दिला.