कोल्हापूरचा शाही दसरा उत्साहात
By Admin | Updated: October 22, 2015 19:37 IST2015-10-22T19:16:08+5:302015-10-22T19:37:28+5:30
आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार, चोपदार, घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानीची पालखी, ऐतिहासिक मेबॅक कारमधून आली

कोल्हापूरचा शाही दसरा उत्साहात
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि.२२ - आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार, चोपदार, घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानीची पालखी, ऐतिहासिक मेबॅक कारमधून आलेल्या कोल्हापूर संस्थानच्या श्रीमंत शाहू महाराजांची उपस्थिती, बंदुकीच्या फैरी झाडून अंबाबाईला दिलेली सलामी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोल्हापूरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असा शाही दसरा सोहळा गुरुवारी संपन्न झाला. अंबाबाई, तुळजाभवानीची ईश्वरी सत्ता आणि संस्थान सत्तेच्या संगमाने झालेल्या या शाही सीमोल्लंघन सोहळ्यामध्ये ‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’ अशा एकमेकांना शुभेच्छा देत नागरिकांनी सोने लुटले.
युद्धानंतर दुर्गेच्या विजयोत्सवाचा परमोच्च क्षण म्हणजे सीमोल्लंघन सोहळा. यानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली. आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवी रथात बसून जाते, असा यामागील अन्वयार्थ आहे. संस्थान खालसा झाले असले तरी कोल्हापुरातील संस्थानकालीन परंपरा आजही सुरू आहेत. त्यातील महत्त्वाचा उत्सव म्हणजे शाही दसरा. सायंकाळी पाच वाजता अंबाबाईच्या आणि तुळजाभवानी देवीच्या पालख्या आपल्या लवाजम्यानिशी दसरा चौकात आल्या. छत्रपतींचेही मेबॅक कारमधून सोहळास्थळी आगमन झाले. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर सहा वाजता बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर पूजेच्या शमीवृक्षाचे सोने लुटण्यासाठी नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. छत्रपतींनी मेबॅक कारमध्ये उभे राहून कोल्हापूरकरांकडून सोने स्वीकारले. त्यानंतर जुना राजवाड्यात दसऱ्याचा दरबार भरविण्यात आला. अंबाबाईची पालखी आपल्या लवाजम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदीघाट, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली.