नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:49 IST2025-07-21T09:49:23+5:302025-07-21T09:49:46+5:30
राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे जे, कामा, सेंट जॉर्जेस आणि जीटी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.

नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
मुंबई : राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे जे, कामा, सेंट जॉर्जेस आणि जीटी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. केवळ अतितत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.
विशेष म्हणजे प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. रुग्णालयात आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा डिस्चार्ज घेत आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयातील वॉर्ड आणि अतितत्काळ विभागात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. त्यासोबत परिविक्षाधीन कालावधीतील काही परिचारिकांची मदत घेत रुग्णांना सेवा दिली जात आहे. एकट्या जे जे रुग्णालयात ७००-७५० नियमितपणे कार्यरत असणाऱ्या परिचारिका संपावर असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उपचारांची गरज असूनही काही रुग्ण डिस्चार्ज घेत असल्याचे चित्र या रुग्णालयात आहे.
विशेष म्हणजे नवीन रुग्णांना उपचारासाठी भरती करताना परिचारिका संपावर गेल्याचे सांगून त्यांना महापालिकेच्या दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. अतितत्काळ विभागातील रुग्णांना मात्र उपचार दिले जात आहेत. जे जे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, परिचारिकांअभावी रुग्णालय चालविताना डॉक्टरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नियमित शस्त्रक्रिया परिचारिकांशिवाय करणे शक्य नाही. त्यामुळे काही रुग्ण डिस्चार्ज घेत आहेत. मात्र जबरदस्तीने कुणाला डिस्चार्ज दिला जात नाही. उपलब्ध मनुष्यबळावर रुग्णांवर उपचार केले जात आहे.
संघटनेच्या मागण्या
> केंद्र सरकारप्रमाणे नर्सिंग ७,२०० रुपये भत्ता, १,८०० रुपये गणवेश भत्ता मंजूर करावा. पात्र परिचारिकांना शैक्षणिक भत्ते द्यावेत.
> सेवा प्रवेश नियमांतील त्रुटी दूर कराव्यात.
> केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामामध्ये बदल करावा.
> परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना बदली धोरण २०१८मधून वगळून प्रशासकीय बदली न करता विनंती व तक्रार आधारित बदली करावी.
> राज्य शुश्रूषा सेल स्थापन करून, परिचारिकांच्या संवर्गातील ३ प्रतिनिधी व सर्व पदे भरावीत.
> वाढती लोकसंख्येनुसार व खाटांनुसार परिचारिकांची पदनिर्मिती करावी. नवीन आकृतिबंध मंजूर करावा. ग्रामीण रुग्णालयातील रद्द केलेले परिसेविका पद पुनरुज्जीवित करण्यात यावे.