अंथुर्णेत निकृष्ट धान्याचा पुरवठा
By Admin | Updated: July 31, 2016 01:16 IST2016-07-31T01:16:19+5:302016-07-31T01:16:19+5:30
येथे दर महिन्याला निकृष्ट धान्यपुरवठा होत आहे.

अंथुर्णेत निकृष्ट धान्याचा पुरवठा
अंथुर्णे : येथे दर महिन्याला निकृष्ट धान्यपुरवठा होत आहे. अतिशय निकृष्ट सडलेला गहू, बारीक व भिजलेली साखर, त्याच पद्धतीचा तांदूळ व धान्यात खडे, माती व मोठ्या प्रमाणावर असलेल्या उंदरांच्या लेंड्या अशा पद्धतीचे धान्य अंथुर्णे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडावूनमध्ये असलेल्या स्वस्त धान्य दुकानात येत असते. त्याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
सर्वसामान्य गोरगरीब याच धान्याची पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. परंतु हेच धान्य गेल्या दोन महिन्यांपासून अनेकांना मिळालेले नसल्याने व चांगल्या प्रतीचे धान्य घेण्याची ऐपत नसल्याने अनेकांना उपासमार करावी लागत आहे. या स्वस्त धान्य दुकान चालकाकडे धान्य केव्हा मिळणार, या बाबत विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळतात.
येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडावूनमध्ये सोसायटीचे स्वस्त धान्य दुकान आहे. या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या तारखेला धान्य येते. आलेले धान्य वाटपाकरिता शासन नियमाप्रमाणे व दिलेल्या वेळेत हे दुकान सुरू नसते. दुकानचालकाच्या सवडीने हे दुकान सुरू असल्याने अनेकांना अंथुर्णे व परिसरातून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून यावे लागते.
त्यात महिलावर्गाला गैरसोयीला सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा कमी प्रमाणात व निकृष्ट धान्य या ठिकाणी दिले जात असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. काही वेळा कमी कोटा आल्याचे सांगून धान्य दिले जात नाही. परिणामी दर महिन्याला या ठिकाणी शाब्दिक तक्रारी मोठ्या प्रमाणवर होत असतात.
संबंधित पुरवठा अधिकाऱ्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने तालुक्यातील अन्य अनेक स्वस्त धान्य दुकानांची अशीच अवस्था आहे. या दुकानदारांना अधिकृत सरकारी परवाना असला, तरी ते त्यानुसार वागत नाहीत, आमचे कोणीच काही करू शकत नाही या आविर्भावात असतात. तसेच या ठिकाणी असणाऱ्या विविध अंत्योदय बीपीएल शिधापत्रिकांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणे गरजेचे आहे.
दरमहा येणारा धान्याचा कोटा तपासला जाणे आवश्यक आहे. या ठिकाणची गावपातळीवरील स्थानिक दक्षता कमिटी फक्त भिंतीवर लावलेल्या नावापुरतीच मर्यादित असून, या कमिटीचे नक्की काय काम आहे हेच नागरिकांना अघापपर्यंत माहिती नाही. (वार्ताहर)
तक्रारीची दखल नाही : स्वच्छतेचा अभाव
परिसरातील इतर स्वस्त धान्य दुकानांत वेळेवर व चांगल्या प्रतीचे धान्य दर महिन्याला येते. परंतु वर्षानुवर्षे या ठिकाणची परस्थिती जैसे थे असून, या बाबत लोकांच्या तक्रारींची दखल घेण्याकरिता या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. साधी तक्रार पुिस्तका तर सोडाच दरफलकही येथे नाही. वेळेचा फलक बाहेर पेंटने तयार केला आहे. त्याप्रमाणे दुकान कधीच उघडे नसते. मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेचा अभाव असल्याने घुशी व उंदरांचा सुळसुळाट या धान्य दुकानात आहे.