एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:56 IST2025-10-31T12:54:02+5:302025-10-31T12:56:49+5:30
Rohit Arya Encounter : मुंबई पोलिसांनी काल जाणीवपूर्वक रोहित आर्या याच्या छातीत गोळी मारली, असा आरोप आता सुरू झाला आहे.

एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
Rohit Arya Encounter : काल मुंबईतील पवईच्या स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेत ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला, यामध्ये आर्या याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता आरोप सुरू झाले आहेत. वकील नितीन सातपुते यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'रोहित आर्या याचा मुंबई पोलिसांनी केलेला एन्काऊंटर बनावट होता. पोलिसांना रोहित आर्या याच्या हातावर किंवा पायावर गोळी मारणे शक्य होते. पण, डीसीपी अमोल वाघमारे यांना हिरो व्हायचे होते, त्यामुळे त्यांनी रोहित आर्या याच्या छातीत गोळी मारुन त्याला ठार केले',असा गंभीर आरोप वकील सातपुते यांनी केला.
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
काल मुंबई पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटवर वकील नितीन सातपुते यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते त्यावेळी पोलिस अधिकारी दत्ता नलावडे रोहित आर्या याच्या संपर्कात होते. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांसोबत संवाद का साधला नाही? आर्या याला माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत संवाद साधायचा होता, तर पोलिसांनी का संवाद करुन दिला नाही? पोलिसांनी एन्काऊंटर सारखे टोकाचे पाऊलं का उचलले?, असा सवाल वकील वकील नितीन सातपुते यांनी केला.
"रोहित आर्या याने मुलांना ओलीस ठेवण्याचे पाऊल उचलले पण ही परिस्थिती सरकारमुळेच आली. हा प्रसंग टाळता आला असता. आर्या याने त्याने केलेल्या कामाचे पैसे मिळावेत म्हणून उपोषण केले. पण सरकारने तरीही पैसे दिले नाहीत. रोहित आर्या हा दहशतवादी नव्हता. मग त्याचा ए्काऊंटर का केला?, असे प्रश्न सातपुते यांनी केले.
वकीलांनी संशय व्यक्त केला
मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याच्याकडे पिस्तूल होती की नाही. याची माहिती पोलिसांनी अजून दिलेली नाही. पोलिस अधिकारी नलावडे यांनी आर्या याच्याकडे पिस्तूल होती की नाही याचा तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. मुलांना वाचवताना पोलिसांना त्याच्या पायावर गोळी मारता आली असती. अशा पद्धतीची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण दिलेले असते. मग त्यांनी पायावर गोळी का मारली नाही? या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वकील सातपुते यांनी केली.