राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट
By दीपक भातुसे | Updated: April 17, 2025 11:59 IST2025-04-17T11:56:21+5:302025-04-17T11:59:59+5:30
सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार २७ महापालिकांसाठी १०० रोबोट खरेदी करणार आहे.

राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट
- दीपक भातुसे, मुंबई
मॅनहोलची सफाई करताना सफाई कामगारांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी यापुढे रोबोटद्वारे मॅनहोल सफाई होणार असून त्यासाठी राज्य सरकार १०० रोबोटची खरेदी करणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती यासारख्या महापालिकांसाठी ही रोबोट खरेदी केली जाणार आहे.
देशभर अनेक शहरांत सफाई कामगारांना प्रत्यक्ष मॅनहोलमध्ये उतरवून सफाई केली जाते. राज्यात झालेल्या ८१ मृत्यूंची गंभीर दखल घेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने अशा कामांचे सामाजिक लेखापरीक्षण केले होते आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची दखल घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरेही ओढले होते. त्यामुळे मॅनहोलच्या सफाईसाठी रोबोट खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर आला असून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने यात पुढाकार घेतला आहे.
आतापर्यंत ८१ सफाई कामगारांचा मृत्यू
राज्यात मॅनहोल सफाई करताना आतापर्यंत ८१ सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ११ मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील, १२ ठाणे जिल्ह्यातील, ७ पालघर जिल्ह्यातील आणि २ रायगड जिल्ह्यातील सफाई कामगारांचा समावेश होता.
छत्रपती संभाजीनगरात एक महिना चाचणी
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही प्रथम छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नवीन रोबोटची एक महिन्याची चाचणी घेणार आहोत. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आम्ही १०० रोबोट खरेदी करणार असून ते राज्यातील २७ महापालिकांमध्ये दिले जातील. केरळसारख्या राज्यात अशा प्रकारचे रोबोट आधीच वापरले जात असल्याचे शिरसाट म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या दोन रोबोट वापरले जात आहेत, मात्र त्यांची क्षमता कमी आहे. आम्ही जे नवीन रोबोट खरेदी करणार आहोत. त्यांची कचरा साफ करण्याची आणि तो वेगळे करण्याची क्षमता जास्त आहे.
-संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री