पारदर्शकतेसाठी रस्त्यावर
By Admin | Updated: March 6, 2017 04:01 IST2017-03-06T04:01:22+5:302017-03-06T04:01:22+5:30
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सुचविलेल्या कामांवरच नगरसेवकांनी आपला निधी खर्च करावा, असा निर्णय घेतला

पारदर्शकतेसाठी रस्त्यावर
डोंबिवली : भाजपाने मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभाराचा मुद्दा लावून धरला असतानाच ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सुचविलेल्या कामांवरच नगरसेवकांनी आपला निधी खर्च करावा, असा निर्णय घेतला आहे. याच पारदर्शकतेचे अनुकरण कल्याण-डोंबिवली महापालिकेतही करावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी-लेनीनवादी) पक्षाने रविवारी डोंबिवलीतील दत्तनगर चौकात स्वाक्षरी मोहीम राबवली. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर राबविलेल्या या उपक्रमाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ठाणे महापालिकेतील नगरसेवकांना यापुढे आपला नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा आणि मागासवर्गीय निधी नागरिकांनी सुचविलेल्या कामांवरच खर्च करावा लागेल असा निर्णय आयुक्त जयस्वाल यांनी नुकताच घेतला. यामुळे नगरसेवक निधीच्या नावाने होणाऱ्या कोटयवधीच्या भ्रष्टाचाराला चाप बसणार आहे. असा निर्णय केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनीही घ्यावा अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल तर ठाणे महापालिका आयुक्तांप्रमाणे रवींद्रन यांनीही कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे पक्षाचे पदाधिकारी महेश साळुंखे आणि सुनील नायक यांनी सांगितले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात नगरसेवक निधीसाठी कोटयवधी रूपये ठेवले जातात. यंदा १४ कोटी ३५ लाखांची तरतूद केली आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या कराच्या रूपात हा निधी दिला जातो. गटार, पायवाटा बांधण्यावर हा खर्च केला जातो. परंतु त्याला लागणारा विलंब आणि कामांचा दर्जा पाहता यात भ्रष्टाचार होत असल्याकडे नायक यांनी लक्ष वेधले. कंत्राटदाराला पैसे कामांचा दर्जा तपासून नागरिकांच्या संमती शिवाय देऊ नयेत, अशीही मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
>निर्णय घेईपर्यंत राबवणार मोहीम
स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती साळुंखे यांनी दिली. सोमवारी स्वाक्षरीचे निवेदन आयुक्त रवींद्रन यांना सादर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढच्या रविवारी डोंबिवली पश्चिमेत ही मोहीम राबविली जाणार आहे. जोपर्यंत आयुक्त निर्णय घेत नाही तोपर्यंत डोंबिवली शहरात हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे साळुंखे म्हणाले.
‘लोकमत’च्या वृत्ताचे कात्रण
दरम्यान, दत्तनगर चौकात राबविलेल्या मोहिमेच्या ठिकाणी ‘लोकमत’मध्ये आलेल्या वृत्ताचे कात्रण लावले होते. तेथील सूचना फलकावरील ‘नगरसेवकांचा निधी ठाणेकरांच्या हाती’ हे वृत्त लक्षवेधी ठरले.