एका ट्रक चालकाचे अपहरण केल्याप्रकरणी नवी मुंबईपोलिसांनी माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली. एका अधिकाऱ्यानी शनिवारी ही माहिती दिली. अपहरणासाठी वापरलेली एसयूव्ही पुणे येथील खेडकर कुटुंबाच्या बंगल्यातून जप्त करण्यात आली. ड्रायव्हरची ओळख पटली असून प्रफुल्ल साळुंखे, असे त्याचे नाव आहे.
दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील मुलुंड-ऐरोली रस्त्यावर ही घटना घडली. एका काँक्रीट मिक्सर ट्रकने एका लँड क्रूझरला धडक दिली. त्यानंतर ट्रक चालकाला एसयूव्हीमध्ये जबरदस्तीने बसवून पुण्यात नेण्यात आले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) (अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर हे देखील आरोपी असून ते सध्या फरार आहेत.
पोलिसांनी ट्रक चालकाची सुटका करण्यासाठी खेडकर यांच्या बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता, पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी त्यांना अडवल्याचा आरोप आहे. यामुळे, पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली.
आरक्षणाचे फायदे मिळविण्यासाठी खेडकर यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा, २०२२ च्या अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप आहे. ज्यामुळे तिच्याविरुद्ध केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई सुरू केली. दिल्ली पोलिसांनीही त्यांच्याविरुद्ध विविध गुन्ह्यांसाठी एफआयआर दाखल केला. याआधी, मनोरमा खेडकर यांना एका शेतकऱ्याला धमकावल्याच्या व्हिडिओ प्रकरणात अटक करण्यात आली. नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.