हद्दीच्या वादात रस्ता खड्ड्यात
By Admin | Updated: July 22, 2016 03:10 IST2016-07-22T03:10:22+5:302016-07-22T03:10:22+5:30
मुंबई महापालिकेच्या एल आणि एच/पूर्व विभागात हद्दीचा वाद सुरू आहे.

हद्दीच्या वादात रस्ता खड्ड्यात
सचिन लुंगसे,
मुंबई- मुंबई महापालिकेच्या एल आणि एच/पूर्व विभागात हद्दीचा वाद सुरू आहे. त्यामुळे सांताक्रुझ-सीएसटी रोडवर पडलेले भलेमोठे खड्डे उघडे पडले आहेत. येथील खड्डे ४ सेंटीमीटर खोल असून, खड्ड्यांची लांबी आणि रुंदी अनुक्रमे ८, ४ फूट आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात आलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूककोंडीत भर पडत आहे. येथील वाहतूककोंडीने प्रवाशांचा ४५ मिनिटांचा वेळ वाया जात आहे. ऐन पावसाळ्यात खड्ड्यांनी वाहनचालकांच्या नाकीनऊ आणले आहेत.
सांताक्रुझ पूर्वेकडून लाल बहादूर शास्त्री मार्गासह (एलबीएस) सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडला (एससीएलआर) सांताक्रुझ-सीएसटी हा रस्ता जुळतो. याच रस्त्याला वांद्रे-कुर्ला संकुलातील रस्ता कपाडियानगर येथे येऊन मिळतो. नेमके याच रस्त्यावरील सिग्नलसह मिठी नदीच्या पुलावर खड्डे पडले आहेत; शिवाय सांताक्रुझ-सीएसटी रोडच्या किनारपट्ट्यांचीही काही प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सांताक्रुझ पूर्वेकडून एलबीएससह एससीएलआरवर वाहणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास होतो आहे.
कपाडियानगर येथील सिग्नल आणि मिठी नदीच्या पुलावर पडलेले खड्डे किमान ४ सेंटीमीटर खोल आहेत. खड्ड्यांची लांबी ८ फूट तर रुंदी ४ फूट आहे. कपाडीयानगरच्या सिग्नलवर पडलेल्या खड्ड्यांची संख्या सुमारे ५३ आहे. मिठी नदीच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांची संख्या सुमारे १०७ आहे. या खड्ड्यांमुळे कुर्ला, सायन, वांद्रे आणि सांताक्रुझकडे जाणाऱ्या वाहनांना हादरे बसत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतूककोंडीत वाढ होत आहे. या वाहतूककोंडीमुळे कुर्ला, सायन, वांद्रे आणि सांताक्रुझकडे जाणाऱ्या वाहनांना ४५ मिनिटे अधिक लागत आहेत.
खड्ड्यांमुळे सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर सर्वाधिक वाहतूककोंडी होत आहे. एलबीएस मार्गावरील वाहनचालकांना सायन किंवा घाटकोपरला वळसा घालून मुंबईबाहेर जाण्याऐवजी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवरून जाता यावे; म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा रस्ता बांधला. तब्बल ८ वर्षांहून अधिक काळ सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडचे काम सुरू होते. आता हा रस्ता पूर्ण झाला असला तरी सांताक्रुझ-सीएसटी रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना मनस्ताप होत आहे.
>खड्ड्यांमुळे शेअर रिक्षांसाठी अधिक चार्ज
सांताक्रुझ-सीएसटी रोडवरून रिक्षा वाहण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: कुर्ला स्थानक आणि सांताक्रुझ स्थानकाकडे वाहणाऱ्या शेअर रिक्षा या रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. येथील खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होत असून, स्थानक दिशेला जाण्यास वेळ लागतो. वेळ लागत असल्याने मीटरचे रीडिंग वाढते; शिवाय शेअर रिक्षाचालकाकडून १०ऐवजी १५ रुपये आकारले जातात. परिणामी, ग्राहकांना याचा नाहक भुर्दंड सोसावा लगतो. दुसरीकडे या खड्ड्यांमुळे रिक्षांचे स्पेअर पार्ट्स ढिल्ले होत असल्याने रिक्षाचालकांच्या खर्चात भर पडते. येथील खड्ड्यांचा त्रास पावसाळ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर वर्षाचे बारा महिने हा रस्ता खराब असतो.
>वाहतूक पोलीसही कंटाळले
मंगळवारी सकाळी ९ ते १० या वेळेत ‘लोकमत’ने सांताक्रुझ-सीएसटी रोडची दुरवस्था कॅमेऱ्यात कैद केली. या वेळी कपाडियानगर येथील सिग्नलवर दोन वाहतूक पोलीस तैनात होते. ‘लोकमत’ टीम खड्ड्यांचे वृत्तांकन करत असल्याचे पाहून ‘तुम्हीच या रस्त्यांचे काहीतरी करू शकता, आम्ही वाहतूककोंडीला कंटाळलो आहोत,’ अशी भावना त्यांनी
व्यक्त केली.
महत्त्वाचे म्हणजे ‘लोकमत’ टीमने जेव्हा येथील खड्ड्यांची लांबी, रुंदी आणि खोली मोजण्याचे काम हाती घेतले; तेव्हा वाहतूक पोलिसांनी आवर्जून वाहने सिग्नलवर थांबवले. मोठ्या खड्ड्यांची लांबी, रुंदी आणि खोली मोजून झाल्यानंतरच वाहतूक पोलिसांनी वाहने सोडली. शिवाय येथील रस्त्यांसाठी काहीतरी करा, अशी विनंतीही पोलिसांनी केली.