ठाण्यात रिक्षाचालकांचा उद्दामपणा सुरूच, पुन्हा एकदा तरुणीला मारहाण
By Admin | Updated: July 7, 2017 14:56 IST2017-07-07T14:45:34+5:302017-07-07T14:56:09+5:30
ठाण्यात रिक्षाचालकांच्या उद्दामपणाला पारावार उरला नाहीये.

ठाण्यात रिक्षाचालकांचा उद्दामपणा सुरूच, पुन्हा एकदा तरुणीला मारहाण
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 7 - ठाण्यात रिक्षाचालकांच्या उद्दामपणाला पारावार उरला नाहीये. कालच रिक्षाचालकाकडून तरुणीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला असतानाच आता पुन्हा एकदा रिक्षाचालकानं एका तरुणीला मारहाण केली आहे. त्यामुळे ठाण्यात दिवसेंदिवस रिक्षाचालकांच्या मुजोरीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.
गावदेवी परिसरातून चरई येथे कामावर जात असताना रिक्षाचालकाने दुसऱ्या बाजूने रिक्षा नेली. त्यावेळीच संतापलेल्या तरुणीने रिक्षाचालकाला याचा जाब विचारला. रिक्षाचालक उद्दामपणा दाखवत त्या तरुणीच्या अंगावर धावून गेला आणि तिला मारहाण केली. संतापाच्या भरात त्या रिक्षाचालकाने तरुणीच्या थेट श्रीमुखात भडकावली. त्यानंतर रिक्षाचालकानं त्या तरुणीला जबरदस्त मारहाण केल्यामुळे ती जागच्या जागीच कोसळली. या प्रकाराची माहिती मिळताच ठाणे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कालच एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सिकंदर निसार शेख (28, रा. राबोडी) याला बेड्या ठोकल्या होत्या. तसेच ठाणे स्थानक सॅटीस परिसरात अन्य एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या शशिकांत सावंत (30, रा. डोंबिवली) या दोघांनाही ठाणे नगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली होती.
आणखी वाचा
पहिली घटना बुधवारी रात्री ठाणे सॅटीस ब्रिजखाली घडली होती. ठाण्यातील कंपनीत नोकरीला असलेली 25 वर्षीय तरुणी घरी जाण्यासाठी सॅटीस पुलाखाली उभी असताना दादरच्या हेल्थ केअरमध्ये नोकरीला असलेल्या शशिकांतने विनयभंग केल्याचा आरोप तिने केला. आपला या तरुणीला चुकून धक्का लागल्याचा दावा त्याने केला. तो नशेत असल्याने त्याने जाणूनबुजून विनयभंग केल्याचा आरोप करून या तरुणीने त्याच्या श्रीमुखातही लगावली. त्याचवेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.