मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील आजारी विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधी नियमित आढावा घेण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागाच्या आश्रमशाळा वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले असून, ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विविध मार्गदर्शक सूचना विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी केल्या आहेत. आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. हँड सॅनिटायझर, साबण, हँडवॉश लिक्विड, ब्लिचिंग पावडर यांसारखे स्वच्छताविषयक साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून, त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अथवा कार्यालयीन खर्च यामधून निधी वितरित करावा.आजारी विद्यार्थ्यांना आश्रमशाळा वसतिगृहांतील सिक रूममध्ये निगराणीखाली ठेवण्यात यावे. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये अशी लक्षणे दिसून येत आहेत का, याबाबत वर्गशिक्षकांनी खात्री करावी. आजारी व्यक्तीने डिस्पोजल मास्क वापरावेत. शाळेची इमारत, सिक रूम, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची दैनंदिन साफसफाई करावी, अशा सूचना विभागाकडून देण्यात आल्या आहेत.आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समिती व शाळा आरोग्य समितीच्या सदस्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी. कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक मदत उपलब्ध होण्यासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत अटल आरोग्य वाहिनी, डिजी हेल्थ प्रणाली यांसारखी २४ तास मदत केंद्रे उपलब्ध करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आजारी विद्यार्थ्यांचा घेणार आढावा, आदिवासी विकास विभागाकडून मार्गदर्शक सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 07:03 IST