नऊ व्यवसायातून करणार ठेवी परत

By Admin | Updated: September 12, 2014 00:50 IST2014-09-12T00:50:43+5:302014-09-12T00:50:43+5:30

जामीन मिळाल्यास आपण श्रीसूर्या समूहांतर्गत चालणाऱ्या नऊ व्यवसायातील नफ्यातून गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करू, असे स्पष्टीकरण श्रीसूर्या समूहाचा प्रबंध संचालक आरोपी समीर सुधीर जोशी याने

Returns from nine business deposits | नऊ व्यवसायातून करणार ठेवी परत

नऊ व्यवसायातून करणार ठेवी परत

समीर जोशीचे न्यायालयात स्पष्टीकरण
नागपूर : जामीन मिळाल्यास आपण श्रीसूर्या समूहांतर्गत चालणाऱ्या नऊ व्यवसायातील नफ्यातून गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करू, असे स्पष्टीकरण श्रीसूर्या समूहाचा प्रबंध संचालक आरोपी समीर सुधीर जोशी याने एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. मुळे यांच्या न्यायालयात सादर केले.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या समीर जोशीने ८ आॅगस्ट २०१४ रोजी न्यायालयात हमीपत्र दाखल केले होते. गुंतवणूकदारांच्या ठेवी जामीन मंजूर झाल्यानंतर एका वर्षात परत करतो, असे त्याने या हमीपत्रात नमूद केले होते.
पीडित गुंतवणूकदारांच्या वतीने मध्यस्थ म्हणून न्यायालयात बाजू मांडणारे अ‍ॅड. बी. एम. करडे यांनी या हमीपत्रावर न्यायालयात निवेदन सादर केले होते. आरोपीला ठेवी परत करण्याचे स्रोत उघड करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी विनंती अ‍ॅड. करडे यांनी न्यायालयाला केली होती.
या निवेदनावर समीर जोशी याने ठेवी परत करण्याचे नऊ स्रोत स्पष्टीकरणासह उघड केले. यात त्याने असे नमूद केले की, अटकेपूर्वी आपला ‘श्रीसूर्या ट्रॅव्हल लिंक’ हा व्यवसाय जोरात सुरू होता. आपल्या ५५ बसगाड्या धावत होत्या. नारायण विद्यालय, गुरुनानक अभियांत्रिकी महाविद्यालय, इरा इंटरनॅशनल स्कूल, गोंडवाना स्कूल यांच्याशी आपला करार होता.
चंद्रपूर एमआयडीसी येथे श्रीसूर्या डेअरी फार्म या नावाने कंपनी कार्यरत होती. दूध आणि दुधापासून तयार होणारी पनीरसारखी उत्पादने या कंपनीत होत होती. या उत्पादनांचे संपूर्ण विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या काही भागात वितरण केले जात होते. यातून चांगला नफा मिळत होता. नागपुरात भंडारा मार्गावर श्रीसूर्या बेकरी कार्यरत होती. बेकरीत ब्रेड, बिस्किट, टोस्ट, केक, पाव आदींचे उत्पादन केले जात होते. हा व्यवसायही चांगली मिळकत देणारा होता.
अंजनगाव सूर्जी येथे ‘श्रीसूर्या आॅईल’ या नावाने रिफायनरी फॅक्टरी कार्यरत होती. क्रूड आॅईल विकत घेऊन रिफायनरी प्रक्रियेने श्रीसूर्या आॅईल या नावाने संपूर्ण राज्यातील बाजारपेठांमध्ये खाद्य तेलाचे वितरण केले जात होते. अजनी काँग्रेसनगर येथे अपोलो इस्पितळाशी संलग्न श्रीसूर्या हेल्थ केअर या नावाने डायग्नोस्टिक सेंटर कार्यरत होते. आपला हॉटेल आणि कॅटरिंगचा व्यवसाय होता. नागपुरात चार आणि तळेगाव येथे एक हॉटेल आहे. छत्रपती चौकातील श्रीसूर्या टॉवरमध्ये जीम, स्पा आणि सलून कार्यरत होते. तरुणांमध्ये ते लोकप्रिय झाले होते. या शिवाय दोन सुपरमार्केट कार्यरत होते. श्रीसूर्या ड्रिम अँड डेस्टिनेशन या नावाने देश-विदेशात ग्राहकांसाठी टूर्स व ट्रॅव्हल्सचे आयोजन केले जात होते.
अटकेपर्यंत आपले हे सर्व व्यवसाय भरभराटीत चालत होते. अटकेनंतर या संदर्भातील परवाने आणि करार तपास अधिकाऱ्याने जप्त केले. त्यामुळे हे सर्व व्यवसाय बंद झाले.
नफा न्यायालयात जमा करणार
आपली जामिनावर सुटका झाल्यास न्यायालयाच्या परवानगीने आपण हे सर्व व्यवसाय सुरू करू यातून जो काही नफा प्राप्त होईल तो न्यायालयात जमा करू, दैनंदिन हिशेब दरमहिन्याला तपास अधिकारी तसेच न्यायालयाकडे सादर करू, असेही समीर जोशी याने आपल्या स्पष्टीकरणात नमूद केले आहे.
पीडित गुंतवणूकदारांच्या वतीने जोशी याच्या या स्पष्टीकरणावर आक्षेप घेण्यात आला. आरोपीने आपल्या मालमत्ता आणि रोख नमूद केलेली नाही. त्याच्या कंपन्या कंपनी अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत नाहीत. या कंपन्यांची सध्याची स्थिती तपास अधिकाऱ्याकडून जाणून घेणे आवश्यक असून ही माहिती सादर करण्यासाठी तपास अधिकाऱ्याला वेळ देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. आता हे प्रकरण १९ सप्टेंबर २०१४ रोजी सुनावणीस येईल.
न्यायालयात पीडित गुंतवणूकदारांच्या वतीने अ‍ॅड. बी. एम. करडे तर आरोपी जोशीच्या वतीने अ‍ॅड. अशोक भांगडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Returns from nine business deposits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.