मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने एकेरी ग्रुप बुकिंगच्या तिकिटांमध्ये आता ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांनी परतीचा प्रवास नाही केला तरी त्यासाठीची ३० टक्के रक्कम ग्रुप बुकिंगमध्ये मोजावी लागणार आहे. एसटी महामंडळाच्या अजब निर्णयामुळे ऐन गणपती सणाच्या तोंडावर चाकरमानी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटी बसमधून सणासुदीच्या काळात आरामात प्रवास करता यावा यासाठी चाकरमानी ग्रुप बुकिंगचा पर्याय निवडतात. ४० पेक्षा अधिक प्रवाशांच्या गटाला ग्रुप बुकिंग पद्धतीने आरक्षण दिले जाते. प्रवाशांकडून प्रामुख्याने गौरी गणपती, होळी, आषाढी पंढरपूर यात्रा व इतर सण समारंभासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रुप बुकिंग केले जाते. परंतु प्रवाशांना गावात पोहचवल्यानंतर परतीच्या प्रवासात बस मोकळी आणावी लागत असल्याचे कारण पुढे करत आता एकूण भाड्याच्या ३० टक्के रक्कम प्रवाशांकडून घेण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी ५ हजार २० विशेष बसची सुविधा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वैयक्तिक तसेच ग्रुप बुकिंगचा पर्याय दिला आहे.
आगाऊ आरक्षणामध्ये १५ टक्के सवलत नाहीच! आगाऊ आरक्षणामध्ये १५ टक्के सवलत देण्याचे धोरण असले तरी गणपती विशेष गाड्यांसाठी हा निर्णय लागू नाही. ग्रुप बुकिंगच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय चुकीचा असून एसटीकडून चुकीच्या नियोजनाचे खापर प्रवाशांवर फोडण्यात येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. ग्रुप बुकिंगसाठी प्रवाशांकडून एकूण अंतराकरिता टप्पेनिहाय प्रवास भाडे आकारणी केली जाते. परंतु २२ जुलैपासून एसटी महामंडळाने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने वाहतूक विभागाच्या सूचनेवरून हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी आहे की नफेखोरीसाठी असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.