वाढत्या तापमानाचा निसर्गावर परिणाम
By Admin | Updated: April 19, 2017 00:45 IST2017-04-19T00:45:01+5:302017-04-19T00:45:01+5:30
गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत

वाढत्या तापमानाचा निसर्गावर परिणाम
अलिबाग : गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत, असा निष्कर्ष भूगोल अभ्यासक तथा पोलादपूर येथील एस.एम.कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.समीर बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. डॉ.बुटाला सातत्याने महाड पोलादपूर परिसरातील वाढत्या तपामानाची नोंद घेवून त्या अनुषंगाने वातावरणातील बदलाचा सातत्यपूर्ण अभ्यास करीत आहेत. मंगळवारी पोलादपूर-महाडमधील दुपारी बारा वाजताचे तापमान ३८ ते ४२ अंश सेल्सिअस इतके आढळले असून, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण २२ टक्के निष्पन्न झाले आहे.
वाढत्या तापमानाचे भौगोलिक परिणाम विषद करताना डॉ.बुटाला म्हणाले, अपेक्षित तापमानापेक्षा अधिक तापमान वाढल्याने पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या ‘वातावरण’ नामक आवरणातील अनेक वायू अधिक प्रमाणात प्रसरित होऊन, त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम प्राणिमात्रांसह भूभागावर देखील होतो. तो परिणाम आता हळूहळू दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे विशेष: सह्याद्री रांगातील खडकातील मूलद्रव्ये प्रसरण पावतात, परिणामी खडक फुटतात. याची प्रचिती महाड तालुक्यातील माझेरी घाटातील भूस्खलनानंतर आली आहे. खडकांप्रमाणेच माती, तिच्या उष्णता ग्रहण करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक तापत असल्याने तिच्यातील नैसर्गिक मूलद्रवे ऱ्हास पावतात. मातीमध्ये अनेक सूक्ष्म जीवांचा अधिवास असतो. हे जीव अतिउष्णतेमुळे नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. माणसासह निसर्गातील प्रत्येक सजिवाची कार्यक्षमता त्याच्यामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. शरीरातील पाण्याच्या प्रमाणात घट होत असल्याने कार्यक्षमता कमी होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
वाढते तापमान व हवेत सोडला जाणारा कार्बन डायआॅक्साईड वायू याचा विशिष्ट परिणाम होत आहे. मुळात कार्बन डायआॅक्साईड हा वायू वातावरणावरच्या स्तरावर राहतो व एखाद्या भांड्यासारखी उष्णता वातावरणातील खालच्या थरात थोपवून धरतो त्यामुळे तापमान अधिक वाढते. याचीही प्रचिती सध्या येत असल्याचा निष्कर्ष डॉ.बुटाला यांनी व्यक्त केला आहे. (विशेष प्रतिनिधी)