ठेकेदारांना परिवहनचा लगाम
By Admin | Updated: August 15, 2016 03:57 IST2016-08-15T03:57:25+5:302016-08-15T03:57:25+5:30
वसई उपप्रादेशिक परिवहन खात्याने आता पालिकेच्या परिवहन सेवा आणि सफाई ठेकेदाराच्या मनमानीला लगाम लावण्यासाठी पावले उचलली

ठेकेदारांना परिवहनचा लगाम
शशी करपे,
वसई- वसई विरार पालिकेला खाजगी वाहने भाड्याने घेताना टी परमिट असलेलीच वाहने घेण्यास भाग पाडणाऱ्या वसई उपप्रादेशिक परिवहन खात्याने आता पालिकेच्या परिवहन सेवा आणि सफाई ठेकेदाराच्या मनमानीला लगाम लावण्यासाठी पावले उचलली आहेत. सुस्थितीत असलेल्या बसेसच्या वापरा आणि त्रुटी दूर करा अन्यथा कडक कारवाई केली जाईल, अशी नोटीस परिवहन खात्याने बजावली आहे. तर कचरा उचलणाऱ्या विना नंबरप्लेट असलेल्या गाड्या जप्त करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
वसई विरार पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांना वापरण्यासाठी खाजगी वाहने घेतली जातात. मात्र, टी परमिट ऐवजी खाजगी वाहने वापरली जात असल्याने सरकारचा लाखो रुपांचा महसूल बुडत असल्याची गंभीर बाब दैनिक लोकमतने चव्हाट्यावर आणल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन खात्याने अनेक गाड्या जप्त करून दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतर पालिकेने टी परमिटची वाहने घेण्यास सुरुवात केली आहे. आता उपप्रादेशिक परिवहन खात्याने पालिकेच्या परिवहन सेवेच ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला लगाम लावण्याची मोहिम हाती घेतली आहे. वसई विरार परिवहन सेवा ठेका पद्धतीवर सुुरु असुन ठेकेदार जुनाट, धूर ओकणाऱ्या बसेस चालवत असल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी आमदार आनंद ठाकूर यांनी केलेल तक्रारीवरून आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी परिवहनच्या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. परिवहन बसेसबाबत अनेक गंभीर स्वरुपाच्या तक्रारी आल्या असून त्रुटी ताबडतोब दूर करण्यात यावत अन्यथा बस जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
धक्कादाक बाब म्हणजे परिवहन ठेकेदार आजही क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करीत असून अनेक बसेस एका बाजूने कलंडलेल्या असतानाही त्या रस्त्यावर वेगाने धावताना दिसतात.
>जुनाट आणि धूर सोडणाऱ्या कालबाह्य गाड्या अजूनही रस्त्यावर
जुनाट आणि धूर ओकणाऱ्या बसेस नंतर आता कचरा उचलणारा ठेकेदार चक्क नंबरप्लेट नसलेल्या गाड्या वापरत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी गाड्यांची तपासणी मोहिम हाती घेतली आहे. तसेच दोन्ही ठेकेदारांना नोटीस बजावली आहे.सफाई ठेकेदार कचरा उचलण्यासाठी कालबाह्य गाड्या वापरत आहेत. तर काही गाड्यांवर नंबरप्लेटही नसताना कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंद गुंजाळकर आणि शिवसेनेचे गटनेते धनंज गावडे यांनी परिवहन खात्याकडे केली होती. त्याचीही देशपांडे यांनी गंभीर दखल घेत गाड्या जप्त करण्याची कारवाई सुरु केली आहे. त्यासाठी परिवहन खात्याने शोधमोहिम हाती घेतली आहे. तसेच सफाई ठेकेदारांनाही याबाबतीत नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.