पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रप्रेमाबद्दल आदर, पत्राद्वारे व्यक्त केली दिलगिरी - श्रीपाल सबनीस
By Admin | Updated: January 12, 2016 18:29 IST2016-01-12T17:26:59+5:302016-01-12T18:29:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केलेला एकेरी उल्लेख चुकीचा असल्याची जाणीव झाल्याने आपण त्यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली, असे श्रीपाल सबनीस यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रप्रेमाबद्दल आदर, पत्राद्वारे व्यक्त केली दिलगिरी - श्रीपाल सबनीस
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राष्ट्रप्रेमाबद्दल मला आदर आहे, त्यांच्याबाबत केलेला एकेरी उल्लेख चुकीचा असल्याची जाणीव झाल्याने आपण त्यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे' असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 'मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला ' असेही ते म्हणाले. झाले गेले विसरून महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण हे पाऊल उचलले, असेही नमूद करतानाच त्यांनी जनतेलाही ही घटना विसरून जाण्याचे व संमेलनाला अवश्य येण्याचे आवाहन केले.
'मी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असून कोणाचीही माफी मागणार नाही, पण माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो' असे सबनीस यांनी म्हटले.
आकुर्डी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात सबनीस यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला होता. 'दहशतवाद्यांकडून धोका असतानाही शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकिस्तानमध्ये गेला, तेथे काही झाले असते तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी मोदीला श्रद्धांजली वहावी लागली असती, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरून मोठा गदारोळ माजला. या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात होती, उमरगा येथील कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन नीट पार पडेल का असा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी पाटील यांच्या मध्यस्थीमुळे सबनीस दिलगिरी व्यक्त करण्यास तयार झाल्याने या वादावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.