रहिवासी आले रस्त्यावर
By Admin | Updated: April 6, 2017 02:21 IST2017-04-06T02:21:11+5:302017-04-06T02:21:11+5:30
गेल्या दहा वर्षांपासून चेंबूरच्या वाशी नाका परिसरात एका खासगी विकासकाकडून एसआरए प्रकल्प सुरू आहे.

रहिवासी आले रस्त्यावर
मुंबई : गेल्या दहा वर्षांपासून चेंबूरच्या वाशी नाका परिसरात एका खासगी विकासकाकडून एसआरए प्रकल्प सुरू आहे. मात्र, झोपड्या तोडून दहा वर्षे उलटूनही विकासकाकडून इमारतींचा पायादेखील खोदला जात नसल्याने, संतापलेल्या रहिवाशांनी बुधवारपासून वाशीनाका परिसरात विकासकाविरुद्ध उपोषण सुरू केले.
२००७ पासून वाशी नाका परिसरातील ओम गणेशनगर आणि अशोकनगर या परिसरात विकासकाकाडून एसआरए प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, गेल्या काही वर्षांत या परिसरातील अडीच हजार झोपड्या विकासकाने जमीनदोस्त केल्या. या सर्व झोपडीधारकांना विकासकाने महिन्याचे भाडे ठरवले होते. त्यानुसार, यातील अनेक जण गावी स्थायिक झाले, तर काही लोक चेंबूर परिसरातच वास्तव्यास आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून या विकासकाने या झोपडीधारकांना घरभाडेही दिले नाही. त्यामुळे अनेकांवर भाड्याची खोली सोडून रस्त्यावर राहाण्याची वेळ आली आहे. याबाबत विकासकासोबत अनेकदा बैठका घेऊनदेखील तोडगा निघत नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे.
त्यामुळे १० वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्पदेखील तत्काळ पूर्ण करावा, यासाठी रहिवाशांनी विकासकाकडे तगादा लावला. मात्र, विकासकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. संतापलेल्या रहिवाशांनी या परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे़ विकासकाकडून वर्षाचे घरभाडे आणि इतर मागण्यांची पूर्तता केली जात नाही, तोपर्यंत रहिवासी उपोषण सुरूच ठेवणार आहेत. (प्रतिनिधी)
२००७ पासून वाशी नाका परिसरातील ओम गणेशनगर आणि अशोकनगर या परिसरात विकासकाकाडून एसआरए प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, गेल्या काही वर्षांत या परिसरातील अडीच हजार झोपड्या जमीनदोस्त केल्या.