कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीवर पुन्हा संवर्धन प्रक्रिया
By Admin | Updated: June 2, 2017 15:41 IST2017-06-02T15:41:10+5:302017-06-02T15:41:28+5:30
रासायनिक संवर्धनामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडत असलेल्या डागांची आणि मूर्तीची शुक्रवारी पुरातत्व खात्याचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी पाहणी केली.

कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीवर पुन्हा संवर्धन प्रक्रिया
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 2 - रासायनिक संवर्धनामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडत असलेल्या डागांची आणि मूर्तीची शुक्रवारी पुरातत्व खात्याचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी पाहणी केली. यानंतर त्यांनी मूर्ती सुस्थितीत आहे. पूजेतील घटकांमुळे व आर्द्रतेमुळे मूर्तीवर पांढरे डाग पडले असून ते घालवण्यासाठी व झीज थांबवण्यासाठी मूर्तीचे पुन्हा संवर्धन करावे लागेल अशी माहिती त्यांनी दिली.
रासायनिक संवर्धनानंतर अवघ्या दोनच वर्षात अंबाबाई मूर्तीवर पांढरे डाग पडल्याचे मागील शुक्रवारी निदर्शनास आले. याची दखल घेत जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांनी तातडीने औरंगाबाद येथील पुरातत्व कार्यालयाशी संपर्क साधला व अधिका-यांना मूर्ती पाहण्याची विनंती केली.
त्यानुसार शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुरात्तत्व खात्याचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी जवळपास एक तास अंबाबाई मूर्तीची पाहणी केली. तसेच महाकाली, महासरस्वती आणि देवीच्या डोक्यावरील मातृलिंगादेखील पाहणी केली. यावेळी आर्द्रता समितीचे सदस्य उदय गायकवाड, संगीता खाडे, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार उपस्थित होते.
या पाहणीनंतर शिवसेनेच्या पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुरातत्व अधिका-यांकडून मूर्तीचे व्यवस्थित संवर्धन झाले आहे. धार्मिक विधी, पूजेसाठी जे द्रव्य वापरले जातात त्यातील घटकांमुळे मूर्तीतील भेगांमध्ये थर साचून पांढरे डाग पडले आहेत.
आर्द्रतेचाही मूर्तीवर फार मोठा परिणाम होत आहे. मूर्तीचे सौंदर्य अबाधीत राखून हे डाग घालवण्यासाठी मूर्तीवर पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करावी लागेल त्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल. या प्रक्रियेमध्ये पहिले दोन दिवस मूर्ती स्वच्छ केली जाते. त्यानंतर त्यावर संवर्धनाचा थर दिला जातो त्यासाठी पुन्हा तीन दिवस लागतील.
या कालावधीत मूर्ती कोरडी ठेवावी लागते. कोणतेही धार्मिक विधी करता येणार नाहीत. यासंबंधीचा अहवाल आम्ही लवकरच देवस्थान समितीला देवू. त्यांच्याशी व श्रीपूजकांशी चर्चा करुन संवर्धनाची तारीख ठरवली जाईल.
गरजेनुसार संवर्धन
अजिंठा, वेरुळ, राजस्थान सारख्या अन्य पुरातन वास्तूंपेक्षा देवतांच्या मूर्तीचा दगड वेगळा असतो. त्यावर धार्मिक विधी केले जातात त्यामुळे त्यांची झिज लवकर होते. एकदा कोटींग केले म्हणजे ते दर सहा महिन्यांनी वर्षानी, दोन वर्षांनी संवर्धन करावेच लागेल असे नाही. तुम्ही मूर्तीची काळजी कशी घेता यावर ते आधारित आहे.
अनेक मूर्तीना संवर्धनाच्या २० वर्षांनंतरही संवर्धनाची गरज भासलेली नाही. काही ठिकाणी वारंवार कोटींग करावे लागते. पूजेच्या पद्धतीत बदल करुन मूर्तीची नियमित स्वच्छता राखली, नियमांचे पालन केले आणि आर्द्रता नियंत्रणात राखली गेली तर मूर्तीवर पून्हा कोणताही परिणाम होणार नाही.