अक्षय ऊर्जा ज्ञानातच आहे

By Admin | Updated: February 8, 2015 01:19 IST2015-02-08T01:19:45+5:302015-02-08T01:19:45+5:30

विज्ञानाचा प्रत्येक शोध ऊर्जेवर आधारित आहे. ऊर्जा कशी तयार होते ते आईनस्टाईनने एका सूत्रात मांडले आणि विज्ञानशोधाची दिशाच बदलली. ‘बिग बँग’मधून ब्रह्मांड निर्माण होते,

Renewable energy is in knowledge | अक्षय ऊर्जा ज्ञानातच आहे

अक्षय ऊर्जा ज्ञानातच आहे

विजय भटकर : नागभूषण फाऊंडेशनचा नागभूषण पुरस्कार प्रदान
नागपूर : विज्ञानाचा प्रत्येक शोध ऊर्जेवर आधारित आहे. ऊर्जा कशी तयार होते ते आईनस्टाईनने एका सूत्रात मांडले आणि विज्ञानशोधाची दिशाच बदलली. ‘बिग बँग’मधून ब्रह्मांड निर्माण होते, अनंत आकाशगंगा, अनंतकोटी सूर्य, ग्रहमाला हे सारेच कल्पनेच्याही पलीकडले आहे. अद्याप या प्रचंड ऊर्जेची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, कारण अनंत शक्यतांचा त्यात संभव आहे. पण या ऊर्जानिर्मितीचे उत्तर आपल्या भारतीय शास्त्रात आहे. ज्ञान हाच ऊर्जेचा प्रारंभ आहे. अक्षय ऊर्जा हवी असेल तर ती ज्ञानातच आहे त्यामुळे ज्ञानोपासक व्हा, असे आवाहन महासंगणकाचे जनक, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी शनिवारी केले.
नागभूषण फाऊंडेशनतर्फे यंदाचा नागभूषण पुरस्कार डॉ. विजय भटकर यांना नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. भटकर बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खा. अजय संचेती, नागभूषण फाऊं डेशनचे अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, सचिव गिरीश गांधी, नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे उपस्थित होते. हा कार्यक्रम नीरीच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी भटकर म्हणाले, एका छोट्याशा बिंदूतून ऊर्जा कशी तयार होते, याचे विवेचन आपल्या अध्यात्मात आहे. गुलाबराव महाराजांनी निर्माण केलेल्या साहित्यात या विज्ञानाचा अभ्यास आहे. ‘हिग्ज बोसॉन’ या सूक्ष्म कणातही तीच ऊर्जा सापडली आहे. त्यामुळेच ज्ञानाचा आणि ऊर्जेचा काय सहसंबंध आहे, त्याचा शोध मी घेतो आहे. भारत हा युवकांचा देश आहे आणि हीच भारताची शक्ती आहे. अशी स्थिती अनेक देशात हजारो वर्षाने येते. त्यामुळेच आता कुणाचे पाय ओढण्यात वेळ घालविण्याची स्थिती नाही. २१ व्या शतकातला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. १९४७ साली गरीब असलेला भारत आज जागतिक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा आर्थिक देश आहे आणि २०४० साली भारत जगाची महासत्ता होणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात नवी पिढी तयार करणे हे एक आव्हान आपण स्वीकारले आहे. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड मी घालतो आहे, कारण विज्ञानाला विवेक देणारी आपली संस्कृती आहे. त्याशिवाय विज्ञानाचा सामान्यांना उपयोग होणार नाही, असे ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजय भटकर यांच्या शेजारी बसण्याचा योग माझ्यासाठी मोठा आहे. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा हा क्षण मी विसरू शकणार नाही. कमी खर्चात परमसंगणक तयार करणाऱ्या भटकरांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते.
गिरीश गांधी यांच्या कल्पक नेतृत्वातून हा पुरस्कार देण्यात येतो, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी २०२० चे या देशाचे व्हिजन दिले त्यावर नरेंद्र मोदी काम करीत आहे आणि आम्हीही १६ तास काम करतो आहोत. भटकर यांच्या हातूनही ही देशसेवा घडत राहावी, यासाठी जगदंबेला प्रार्थना करतो, असे ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भटकर पुरस्कारांपेक्षा मोठे आहेत. विज्ञानाचा लाभ समाजातील विषमता दूर करण्यासाठी होते. पूर्वी जमीन असणारा श्रीमंत होता, नंतर उद्योग उभारणारा आणि सध्या ज्ञानी माणूस श्रीमंत होतो आहे. ही ज्ञानसाधना सर्वांनीच करीत राहणे हीच देशसेवा आहे. खा. अजय संचेती म्हणाले, भटकरांमुळे या पुरस्काराचीच उंची वाढली. त्यांचा सत्कार नीरीच्या सभागृहात होतो आहे, हे औचित्यपूर्ण आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून सामान्यांचे जीवन समृद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. त्यामुळेच त्यांचा सन्मान करताना आनंद वाटतो. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ट परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा शुभेच्छापर संदेश ऐकविण्यात आला. डॉ. सतीश वटे यांनी भटकर यांचा संक्षिप्त परिचय करून दिला. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर तर आभार ए. के. गांधी यांनी मानले. (प्रतिनिधी)
नागपुरात आयुष्यातील सोनेरी क्षण
नागपूर माझे आवडते शहर आहे. या शहरात आयुष्यातील महत्त्वाचे क्षण घालविले येथेच खूप काही शिकलो. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, याची खंत वाटते. ऋषी आणि कृषी समृद्ध असल्याशिवाय देश संपन्न होणार नाही. त्यामुळेच आपण नैसर्गिक शेती करायला हवी, असे वाटते. शाश्वत शेती हवी असेल तर गाय महत्त्वाची आहे. गाय आपल्या संस्कृतीचा, अर्थविश्वाचाही महत्त्वाचा घटक आहे. याबाबत आयआयटीचे विद्यार्थीही संशोधन करीत आहेत, असे विजय भटकर म्हणाले.

Web Title: Renewable energy is in knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.