Jitendra Awhad ( Marathi News ) : "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असणाऱ्या वाल्मिक कराड याच्यापर्यंत जात आहेत. त्यामुळे तुमच्या या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, तरंच सरपंच हत्या प्रकरणात योग्य चौकशी होईल," अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "मुख्यमंत्री साहेब, वाल्मिक कराड याच्यावर दाखल झालेला खंडणीचा गुन्हा आणि सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण यामध्ये एक लिंक आहे. असं असताना अजूनही वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा का दाखल झालेला नाही? तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घ्या. वाल्मिक कराडचा आका तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेला असताना पोलीस निष्पक्ष चौकशी करतील, अशी आशा कशी बाळगायची? साहेब, खरंच तुमचं महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन मुलांची शपथ आहे तुम्हाला...त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा," असं म्हणत आव्हाड यांनी धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी केली.
दरम्यान, "एक बाई विधवा झाली आहे, आपल्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं आहे... देशमुख यांची दोन मुलं लातुरात अभ्यास करत आहेत...मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून अपेक्षा आहे. राजकीय गुन्हेगारीला देवेंद्र फडणवीस यांच्या दारात स्थान नाही, असं तुम्हाला महाराष्ट्राला दाखवायचं असेल तर निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वात एक समिती गठित करून या हत्या प्रकरणाची चौकशी करा आणि सगळं पाळंमुळं खणून काढा. तुमच्या पोलीस अधिकाऱ्याकडून तपास केल्यास सत्य बाहेर येण्याची आशा नाही," अशी रोखठोक भूमिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे.