मुंबई - राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा महायुती सरकारची कोंडी करण्याची विरोधकांना आयती संधी सापडली आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळातील ४-५ मंत्र्यांना वगळण्याबाबत अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.
संजय राऊत म्हणाले की, राज्यात मंत्री, आमदार मारामाऱ्या करतात. ज्या कृषिमंत्र्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांनी ज्या ४ मंत्र्यांना डच्चू देण्याचं सूचवले आहे. त्यात कोकाटेंचे नाव आहे. अमित शाह यांनी ४-५ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनाही कळवले आहे आणि राष्ट्रवादी संबंधित जी नावे आहेत त्यात कृषिमंत्र्यांचे नाव असल्याचे माझ्याकडे पक्की माहिती आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच केंद्रातील सरकार दुटप्पी आणि ढोंगी आहे. छत्तीसगडमध्ये अनेक राजकीय नेत्यांवर ऑनलाईन गेमिंगच्या आरोपाखाली कारवाई झाली. भूपेल बघेल यांच्या चिरंजीवाला अटक केली. परंतु असेच गुन्हे महाराष्ट्रातील सत्ताधारी करत आहेत. त्यांचे अनेक पैसे ऑनलाईन गेमिंगच्या व्यवहारात आहे. त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने कुठलीही कारवाई केली नाही जी दिल्ली, छत्तीसगडमधल्या राजकारण्यांवर केली. हा सरकारचा दुटप्पीपणाच आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्राच्या हितासाठी बोलणाऱ्याविरोधात याचिका केली जाते
दरम्यान, ठाकरे यांना गुन्हे, याचिका, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट नवीन नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे असतील यांच्यासाठी हे नवीन नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी भूमिका मांडल्याबद्दल याचिका दाखल केल्या जातात. याचिकेचा बाऊ करण्याची गरज नाही. याचिका म्हणजे आमच्यासाठी पदके आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नेत्यांकडे अशी पदके असायला हवीत असं सांगत संजय राऊत यांनी राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर भाष्य केले.