परकेपणाची भावना दूर व्हावी
By Admin | Updated: January 26, 2015 01:00 IST2015-01-26T01:00:41+5:302015-01-26T01:00:41+5:30
भारताच्या अन्य प्रदेशात शांतता असताना पेटलेल्या काश्मीरच्या झळा सोसलेल्या युवकांचे अनुभव व तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न ‘छात्र जागृती’ व पुणे येथील ‘सरहद’

परकेपणाची भावना दूर व्हावी
खरे गणतंत्र कधी मिळणार? : काश्मिरी मुलांनी शेअर केला अनुभव
नागपूर : भारताच्या अन्य प्रदेशात शांतता असताना पेटलेल्या काश्मीरच्या झळा सोसलेल्या युवकांचे अनुभव व तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न ‘छात्र जागृती’ व पुणे येथील ‘सरहद’ संस्थेच्यावतीने ‘काश्मीर येथील मुलांशी संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. रिक्झेन चंडोल, रुबिना अफ जल मीर, स्टॅझिंग दोरेजे, आशिक खान, जाहिद भट, जोगिंदर सिंह यांचा दहशवादाशी झालेला सामना, अनुभव, त्यांना काय वाटते हे रविवारी ‘लोकमत’शी शेअर केले. यावेळी छात्र जागृतीचे सचिव अॅड. निशांत गांधी, व सरहद संस्थेचे प्रशांत तळणीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
गरज इच्छाशक्तीची : जाहिद भट
सध्या एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात असलेला जाहिद भट म्हणाला, चार-पाच वर्षांचा असेल तेव्हा लष्कर आणि काश्मिरी जनता यांच्या संबंधाचे कटू अनुभव अनुभवले. जवान दहशतवादी कारवायांच्या विरोधात लढत होते तरी अनेक वेळा सामान्य आणि निर्दोष नागरिकांना याचा फटका बसत होता. हा त्रास, अपमान त्यावेळी आमच्या सुरक्षेसाठी असलातरी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. हा दृष्टिकोन ‘सरहद’ संस्थेचे संजय नाहर यांच्यामुळे बदलला. आज ‘सरहद’ आणि ‘छात्र जागृती’ या संस्थेच्या माध्यमातून ‘जागो भारत’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. इतकी वर्षे मनात साठून राहिलेला परकेपणा घालवून आपुलकी निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही. पण ती अशक्यही नाही. यासाठी चिकाटी आणि परिस्थितीत बदल घडवून आणण्याच्या इच्छाशक्तीची गरज आहे.
विश्वासाचा पूल बांधला
पाहिजे : जोगिंदर सिंह
मूळ डोडा जिल्ह्यातील नादना गावातील जोगिंदर सिंह (२०) आज पुणे येथून बी.कॉम. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. तो म्हणाला, १९ जुलै १९९९ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास दहशतवाद्यांनी घरावर हल्ला केला. सेनेने स्वत:च्या संरक्षणासाठी दिलेल्या आठ बंदुकीच्या जोरावर माझ्या कुटुंबीयानी हा हल्ला थोपवून धरला. पण त्या रात्री आई-वडिलांसह १५ नातेवाईक मारले गेले. त्यावेळी माझी १२ वर्षांची मोठी बहीण संतोषादेवी हिने मला तिथून बाहेर काढल्याने आज मी जिवंत आहे. हे थांबायला हवे. आजच्या घडीला काश्मीरच्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यांना इथल्या विद्यापीठांनी बोलावून घ्यावे किंवा तिथे विद्यापीठ सुरू करावे. येथील विद्यार्थ्यांना मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद इत्यादी शहरांचा व तेथील रहिवाशांचा परिचय करून द्यावा. एकत्रित शिबिरे घ्यावीत. तसेच काश्मीरमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवून विश्वासाचा पूल बांधावा.
‘सरहद’मुळे बदलली बदल्याची भावना : आशिक खान
मूळ पहेलगाम येथील आशिक खान पुणे येथून बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. तो म्हणाला, जून २००४ त्या घटनेत वडील मारले गेले. त्यावेळी माझ्या मनात बदल्याची भावना निर्माण झाली होती. पण सरहद संस्थेचे संजय नाहर यांच्या संपर्कात येताच भावना बदलली. जम्मू काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, हे कळले. आज त्याच प्रेरणेने ‘जागो भारत’ हे अभियान हाती घेतले आहे. काश्मीरच्या विद्यार्थ्यांना काश्मीरची ओळख करून देऊ शकलो तरी याचा खूप फायदा होईल.
कारगीलची पहिली बातमी वडिलांनी दिली : स्टॅझिंग दोरेजे
अकरावीचे शिक्षण घेत असलेला स्टॅझिंग दोरेजे म्हणाला, कारगीलमध्ये पाकिस्तानी सैनिक शिरले याची पाहिली माहिती माझ्या वडिलांनी लष्कराला दिली. तो म्हणाला, कारगीलमधील गारकून हे माझे मूळ गाव. वडील मेंढपाळ आहेत. १९९९ची ती घटना आहे. मेंढ्या चारण्यासाठी वडील दूर निघून गेले. त्यांना एका पहाडावर पाकिस्तानचे बंकर दिसले. लागलीच याची माहिती त्यांनी तीन पंजाब युनिटला दिली. त्यानंतर लष्कर हरकतीत येऊन त्यांनी पाकिस्तानच्या सैन्याला थोपवून धरले. परंतु नंतर सैन्यांकडून हवे तसे सहकार्य मिळाले नाही. याचे शल्य आजही आहे. भविष्यात सैन्यात जाण्याची इच्छा आहे.
मुलींविषयी जुनाट विचार बदलायला हवेत : रिक्झेन चंडोल
कारगील येथील रिक्झेन चंडोल आज पुण्याच्या एका महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत आहे. ती म्हणाली, वडील सैन्यात होते. एका घटनेत ते शहीद झाले. त्यावेळी मी चार वर्षांची होती. घरची आर्थिक परिस्थिती फार नाजूक होती. एका नातेवाईकाच्या मदतीने सरहद संस्थेचे संजय नाहर यांच्याशी जुडले. आज जेव्हा सुट्यांमध्ये घरी जाते तेव्हा काश्मीर बदलत असल्याची जाणीव होत असली तरी मुलींविषयी जुनाट विचारधारा कायम असल्याचे दिसून येते. हे थांबणे आवश्यक आहे.
भाविनकदृष्ट्या जोडणे
आवश्यक : रुबिना अफजल मीर
नव्या वर्गात असलेली रुबिना अफजल मीर ही मूळ कूपवाडा गावातील आहे. ती म्हणाली, चार वर्षाची असताना आईचा कर्करोगाने मृत्यू झाला. ‘सरहद’ संस्थेमुळे मी पुण्यात आली. पहिल्यांदा शाळेत गेली. तिथेच राहिले असते तर काय झाले असते हा प्रश्न आजही पडतो. काश्मिरी जनतेला त्यांच्या वेगळेपणासह भावनिकदृष्ट्या भारताशी जोडण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. भविष्यात आयपीएस व्हायचे आहे. काश्मीरच्या विकासात माझाही हातभार लागवा ही इच्छा आहे.