असीफ बलवासह सात जणांना दिलासा
By Admin | Updated: May 18, 2016 04:58 IST2016-05-18T04:58:14+5:302016-05-18T04:58:14+5:30
८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने बलवा ग्रुपचे असीफ बलवा व अन्य सहा जणांना मंगळवारी अंतरिम दिलासा दिला.
असीफ बलवासह सात जणांना दिलासा
मुंबई : ८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने बलवा ग्रुपचे असीफ बलवा व अन्य सहा जणांना मंगळवारी अंतरिम दिलासा दिला. उच्च न्यायालयाने या सातही जणांना २५ मेपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. या घोटाळ््यात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ आरोपी आहेत.
विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अॅक्ट) न्यायालयाने काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पंकज भुजबळ यांच्यासह ३४ जणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. अटक होईल, या भीतीने सात जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
बलवा ग्रुपचे असीफ बलवा, संजीव जैन, प्रवीण जैन, चंद्रकांत सारडा, जगदीश पुरोहित, राजेश मिस्त्री व विपुल करकारिया यांनी अटकपूर्व जामिनासाठी व अजामीनपात्र वॉरंटवर स्थगिती मिळवण्याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी या याचिकांवर सुनावणी होती.
‘सहआरोपी के. एस. चमणकर याला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे सर्व आरोपींना सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येऊ देऊ नये. उच्च न्यायालयानेच निर्णय घ्यावा,’ असा युक्तिवाद सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला, तर सरकारी वकिलांनी यावर आक्षेप घेतला. ‘पीएमएलए कलम ४५ अंतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपींना जामीन दिला जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयानेच तसे स्पष्ट केले आहे,’ असा युक्तिवाद सरकारतर्फे अॅड. पूर्णिमा कंथारिया यांनी केला.
न्या. अजय गडकरी यांनी असीफ बलवा याच्यासह सात जणांना अंतरिम दिलासा दिला. (प्रतिनिधी)