नायब तहसीलदारांना मृत्युपूर्व बयाणाच्या कामातून मुक्त करा!
By Admin | Updated: August 4, 2016 23:53 IST2016-08-04T23:53:07+5:302016-08-04T23:53:07+5:30
तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेचे शासनाला साकडे.

नायब तहसीलदारांना मृत्युपूर्व बयाणाच्या कामातून मुक्त करा!
संतोष येलकर
अकोला, दि. ४- राज्यात महसूल विभागांतर्गत नायब तहसीलदारांकडे आधीच भरपूर कामांचा व्याप असताना, मृत्युपूर्व बयाण घेण्याच्या कामात वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मृत्युपूर्व बयाण घेण्याच्या कामातून नायब तहसीलदारांना मुक्त करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने शासनाला साकडे घातले आहे.
महसूल विभागांतर्गत राज्यातील तहसीलदारांना गौण खनिज, शासनामार्फत उपलब्ध होणारे विविध प्रकारचे अनुदान वाटप, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, राजशिष्टाचार, निवडणुका, कायदा व सुव्यवस्था, महसूल प्रकरणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दाखले वाटप अशी विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्यातच मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याचे कामदेखील नायब तहसीलदारांना करावे लागत आहे. महसूल विभागांतर्गत विविध प्रकारची कामे करताना मृत्यू बयाण नोंदविण्याच्या कामासाठी वेळ देणे कठीण होते. त्यामुळे राज्यातील नायब तहसीलदारांकडून मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याचे काम काढून टाकण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने शासनाकडे करण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात यासंदर्भात शासनाच्या महसूल व गृह विभागाकडे संघटनेच्यावतीने निवेदन दिले जाणार आहे.
मृत्युपूर्व बयाणाचे काम विशेष कार्यकारी दंडाधिका-यांकडे द्या!
मृत्यू बयाण नोंदविण्याचे काम नायब तहसीलदारांकडून काढण्यात यावे. या कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांची नेमणूक करून, त्यांच्याकडून मृत्यू बयाण नोंदविण्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेमार्फत शासनाकडे करण्यात येत आहे.
------
"नायब तहसीलदारांना विविध प्रकारची कामे करावी लागतात. त्यामध्येच मृत्युपूर्व बयाण घेण्याच्या कामासाठी नायब तहसीलदारांना वेळ देणे कठीण होते. त्यामुळे मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याच्या कामातून नायब तहसीलदारांना मुक्त करण्यात यावे आणि मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याच्या कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे."
-सुरेश बगळे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटना