नागरिकांना प्रशासनाचा त्रास कमी व्हावा

By Admin | Updated: September 9, 2014 01:16 IST2014-09-09T01:16:18+5:302014-09-09T01:16:18+5:30

सामान्य माणसाच्या अपेक्षा खूप कमी असतात. रस्ते, पाणी, पथदिवे, साफसफाई, विविध दाखले यापुरतीच त्यांची धडपड असते. मात्र, अशा लहान कामांसाठीदेखील प्रशासनाकडून नागरिकांना त्रास होतो.

Reduce the hassle of civil administration | नागरिकांना प्रशासनाचा त्रास कमी व्हावा

नागरिकांना प्रशासनाचा त्रास कमी व्हावा

महापौर दटके यांची अपेक्षा : महापौर-उपमहापौरांचे पदग्रहण
नागपूर : सामान्य माणसाच्या अपेक्षा खूप कमी असतात. रस्ते, पाणी, पथदिवे, साफसफाई, विविध दाखले यापुरतीच त्यांची धडपड असते. मात्र, अशा लहान कामांसाठीदेखील प्रशासनाकडून नागरिकांना त्रास होतो. त्यांची कामे वेळेत होत नाही. नागरिकांना होणारा हा त्रास अर्ध्यावर नेणे हे आपले ध्येय असून प्रशासन सामान्य माणसापर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मत नवनियुक्त महापौर प्रवीण दटके यांनी व्यक्त केले.
नवनियुक्त महापौर प्रवीण दटके व उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांचे सोमवारी सकाळी महापालिकेत आयोजित सोहळ्यात पदग्रहण झाले. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस, मावळते महापौर अनिल सोले, मावळत्या उपमहापौर जैतुनबी अंसारी, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आयुक्त श्याम वर्धने, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे, मनसेचे नेते हेमंत गडकरी, प्रवीण बरडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, दटके यांच्या मातोश्री प्रतिभाताई, पत्नी प्रवदा यांच्यासह दटके- पोकुलवार यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर अनिल सोले म्हणाले, दटके यांच्या कडक स्वभावाविषयी अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कल्पना आहेत. मात्र, प्रवीण कठोर तेवढाच मनाने मृदू आहे. त्याच्यांत जोश आहे पण होशही आहे. त्यांच्या नेतृत्वात महापालिका एका नव्या उंचीवर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ. देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासन व पदाधिकारी एकत्र येऊन काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत दटके यांना शुभेच्छा दिल्या. आ. कृष्णा खोपडे यांनी दटके- पोकलवार ही जोडी मेट्रो रेल्वेच्या गतीने धावेल, असा विश्वास व्यक्त केला. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे म्हणाले, महापौरांना सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. दटके यांची आजवरची वाटचाल सर्वसमावेशक राहिली आहे. त्यांनी वैयक्तिक संबंध जपले.
विरोधी पक्ष आपले काम करीत राहील. मात्र, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. संचालन झोन सभापती गोपाळ बोहरे यांनी केले. आभार उपनेत्या नीता ठाकरे यांनी मानले. (प्रतिनिधी)
प्रभाकरराव दटके यांच्या स्मृतींना उजाळा
याप्रसंगी प्रवीण दटके यांचे वडील दिवंगत प्रभाकरराव दटके यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. माजी महापौर आ. अनिल सोले म्हणाले, प्रभाकरराव आमचे नेते होते. त्यांच्या तालिमीत आम्ही घडलो. मी महापालिकेत त्यांच्या गटाचा प्रतोद होतो. कालांतराने त्यांचा मुलगा प्रवीण हा माझ्या गटाचा प्रतोद झाला. या वेळी सोले यांनी समोर बसलेल्या प्रभाकरराव यांच्या पत्नी प्रतिभाताई यांचे प्रेक्षकात जाऊन स्वागत केले. या वेळी प्रवीण यांचेही डोळे पानावले. आ. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सर्व प्रभाकररावांमुळे घडलो. ते आमचे महापालिकेतील ‘हेडमास्तर’ होते. ते वंचितांचे नेते होते. ते शेवटच्या माणसाचा विचार करायचे. आ. कृष्णा खोपडे यांनीही आपण प्रभाकरांच्या तालमित महापालिका कशी चालवायची याचे धडे गिरविल्याचे सांगितले.

Web Title: Reduce the hassle of civil administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.