दीपक देशपांडेंच्या बडतर्फीची शिफारस
By Admin | Updated: June 21, 2015 02:23 IST2015-06-21T02:23:41+5:302015-06-21T02:23:41+5:30
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बांधकाम खात्यातील घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडे यांना औरंगाबादच्या

दीपक देशपांडेंच्या बडतर्फीची शिफारस
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बांधकाम खात्यातील घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडे यांना औरंगाबादच्या माहिती आयुक्तपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे. या घोटाळ्यात आरोपी झाल्यानंतर देशपांडे स्वत:हून राजीनामा देतील अशी चर्चा होती; पण त्यांनी राजीनामा दिला नाही.
माहिती अधिकार कायद्याच्या कलम १७/१ नुसार आता राज्यपाल सी. विद्यासागर राव हे देशपांडे यांना बडतर्फ करण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाकडे मागतील. एकदा त्यांनी ही अनुमती मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निर्णय देईपर्यंत देशपांडे यांना राज्यपाल निलंबित करू शकतात. (विशेष प्रतिनिधी)
रखडपट्टी...
आदर्श प्रकरणी तत्कालीन माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांना बडतर्फ करण्याची शिफारस तत्कालीन राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर राज्यपालांनी आपल्या अधिकारात तिवारी यांना निलंबित केले. पुढे तिवारींचा माहिती आयुक्तपदाचा कार्यकाळ संपला. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बडतर्फीबाबत कोणताही निर्णय दिला नव्हता.