गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. तसेच पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी अनेक नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होत. नागपूरमधील रामटेक विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचंही पक्षातून निलंबन करण्यात आलं होतं. मात्र हे निलंबन आता मागे घेण्यात आलं असून, मुळक यांना पुन्हा एकदा पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे निलंबन आज औपचारिकरीत्या मागे घेण्यात आले. दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खर्गे व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुळूक यांचे पुन्हा पक्षात स्वागत करून निलंबन मागे घेतल्याचे अधिकृतरित्या घोषित केले.
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीमध्ये नागपूरमधील रामटेक हा विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला होता. त्यामुळे इथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक हे नाराज झाले होते. त्यांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आशिष जयस्वाल विजयी झाले होते. तर राजेंद्र मुळक दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. मुळख यांना तब्बल ८० हजारांहून अधिक मतं मिळाली होती. तर ठाकरे गटाचे विशाल बरबटे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होत.