बाप्पाच्या स्वागतासाठी आसमंत सज्ज
By Admin | Updated: September 5, 2016 02:31 IST2016-09-05T02:31:29+5:302016-09-05T02:31:29+5:30
गणेशोत्सवासाठी अवघा आसमंत सज्ज झाला असून शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत.

बाप्पाच्या स्वागतासाठी आसमंत सज्ज
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी अवघा आसमंत सज्ज झाला असून शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. बहुतांश मंडळांची गणेश देखाव्यांची सजावट पूर्ण झाली आहे. घरगुती गणपतीसाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा, बाप्पाचे दागिने, वस्त्र, गणेश स्थापनेकरिता लागणारे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे.
बाप्पाच्या स्वागताची जंगी तयारी सुरू असून ढोल-ताशा पथकांना पसंती देण्यात येत आहे. शहरातील मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांनी रविवारी मूर्ती आणल्या आहेत. पनवेल परिसरात लेझीम, झांज, झेंडा पथक प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. गणेश मंदिरांमध्येही रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण शहर बाप्पामय झाले आहे. जुईनगरमधील स्वयंभू गणेश मंदिर फुलांनी सजविण्यात आले असून गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीडीचा राजा मंडळाच्या वतीने महिला तसेच मुलांसाठी विविध उपक्रम, स्पर्धा राबविल्या जाणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसविले आहे, तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी मंडळाचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
>गणेशोत्सवात घ्यावयाची काळजी
सार्वजनिक गणेशोत्सवात असंख्य भाविक दर्शनासाठी व पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक आहे. मंडप, स्टेज व इतर साहित्य महावितरणच्या विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोषविरहित असावी. गर्दीच्या ठिकाणी विजेचे वायर्स विस्कळीत स्वरूपात राहणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.मिरवणुकीदरम्यान आजूबाजूला असलेल्या उच्च व लघुदाब वाहिन्या, फिडर पिलर, रोहित्रे आदींपासून मिरवणुकीतील वाहने, देखावे सुरक्षित अंतरावर राहतील, याची काळजी प्रत्येक मंडळाने घ्यावी.
>महावितरणकडून कमी दरात वीज उपलब्ध
सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरती वीजजोडणी प्रतियुनिट ३ रु पये ७१ पैसे अधिक इंधन अधिभार असे वीजदर ठेवण्यात आल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे. घरगुती दरांपेक्षा हे दर कमी असून सार्वजनिक मंडळांना याचा लाभ घेता येणार आहे.
आयोजकांनी सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, कमी दर ठेवण्यामागे हाच मुख्य हेतू असल्याचे महावितरण विभागाने स्पष्ट केले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अधिकृत वीजपुरवठा घेण्यास सार्वजनिक मंडळांनी प्राधान्य द्यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वीजतारा जळणे, शॉर्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे आदी घटनांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तातडीच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना २४ तास सुरू असणाऱ्या १९१२, १८००-२००-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्र मांकावर संपर्क साधता येणार आहे.