रत्नागिरीत मेरीटाईमचे उपकेंद्र होणार
By Admin | Updated: February 18, 2015 23:46 IST2015-02-18T22:15:18+5:302015-02-18T23:46:02+5:30
येथील बंदरांचा विकास तर होईलच, शिवाय येथील विद्यार्थ्याना संबंधित अभ्यासक्रमांसाठी परराज्यात जावे लागणार नाही.

रत्नागिरीत मेरीटाईमचे उपकेंद्र होणार
रत्नागिरी : भारतीय मेरीटाईम बोर्डाने रत्नागिरीमध्ये उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे या ठिकाणी नौदल प्रमाणपत्र व प्रशिक्षण देणारे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील बंदरांचा विकास तर होईलच, शिवाय येथील विद्यार्थ्याना संबंधित अभ्यासक्रमांसाठी परराज्यात जावे लागणार नाही.केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी रत्नागिरीत कार्यक्रमासाठी आले असता, त्यांच्याकडे मेरीटाईम उपकेंद्र सुरू करण्याविषयी मागणी करण्यात आली होती. मागणीसंदर्भात नामदार गडकरी यांनी याबाबत लक्ष घालून संबंधित उपकेंद्र सुरू करण्यास दुजोरा दिला आहे. उपकेंद्राला लागणारी जागा पाहण्यात आली आहे. मेरीटाईम विद्यापिठाचे संचालक जे. के.धर यांनी रत्नागिरीला भेट देऊन जागेची पाहणी केली आहे. समुद्र किनाऱ्यालगत सुमारे १५ एकर जागेची आवश्यकता असल्याने जयगड, व पावस रोड, व रत्नागिरीतील काही जागांची पाहणी करण्यात आली आहे.समुद्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या तरूणांना उपयुक्त असे २ ते ३ वर्षाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या मंडळींना आवश्यक असणारे अभ्यासक्रम वा प्रशिक्षण देणारे याठिकाणी छोटे मोठे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले, तर येथील मंडळींना गोवा किंवा केरळ सारख्या राज्यात जाऊन प्रशिक्षण किंवा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार नाही.जिल्ह्यातील बंदरांचा विकास झाला किंवा सुससज्ज बंदरे उभारली गेली, तर सागरी मालवाहतूक सुरू होईल. रस्त्यांमुळे मालवाहतूकीस होणारा वाढता इंधन खर्च, वाहनांची झीज, शिवाय लागणारा वेळ त्याचप्रमाणे वेळेत न पोहोचल्यामुळे मालाचे होणारे नुकसान आदी बाबी विचारात घेता सागरी वाहतूक निश्चितच उपयुक्त व रास्त दरातील आहे. कोकणात अनेक नवीन कंपन्या येऊ घातल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सागरी वाहतूकीचा विकास होणे गरजेचे आहे. जयगड येथील जिंदल कंपनीमुळे कोकण रेल्वे ते जयगड रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. डिंगणी ते जयगड मार्ग जोडण्यासाठी ७७५ कोटीचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे जर कोल्हापूर जिल्हा कोकणास जोडण्याकरीता कोल्हापूर ते वैभववाडी मार्ग रेल्वेने जोडण्यात आला, तर निश्चितच त्याचा फायदा होईल. रेल्वेमुळे रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल. शिवाय सुरक्षित कमी खर्चाने वाहतूक शक्य होईल. पुढे हीच वाहतूक सागरी मार्गाला जोडल्यास त्याचा फायदा होईल. कार्गो वाहतुकीमुळे निर्यातदारांना फायदा होईल. बंदरांचा विकास झाला तरच कार्गो वाहतूक विकसित होणार आहे. सध्या बंदरांची ६ ते ७ मिलियन टन कार्गो वाहतूक क्षमता आहे. मात्र, भविष्यात ती ५० मिलियन्स टन पेक्षाही वाढू शकते. त्याला मेरीटाईम उपकेंद्राचा मोठा हातभार लागेल. जेणेकरून बंदरांशी संबंधित अभ्यासक्रमांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)