बेळगावात रस्तोरस्ती ‘महाराष्ट्र माझा’

By Admin | Updated: February 8, 2015 02:38 IST2015-02-08T02:38:59+5:302015-02-08T02:38:59+5:30

रस्तोरस्ती शाहीर कृष्णराव साबळेंचं महाराष्ट्र गीत घुमलं. हजारोंच्या संख्येनं मराठीजनांनी आज (शनिवार) सजून-धजून अक्षरश: दिवाळी साजरी केली.

Rastarasti 'Maharashtra My' in Belgaum | बेळगावात रस्तोरस्ती ‘महाराष्ट्र माझा’

बेळगावात रस्तोरस्ती ‘महाराष्ट्र माझा’

राजीव मुळ्ये ञ बेळगाव
‘भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा...’ अशी ललकारी देत बेळगावातला मराठी माणूस उत्साहानं रस्त्यावर उतरला आणि रस्तोरस्ती शाहीर कृष्णराव साबळेंचं महाराष्ट्र गीत घुमलं. हजारोंच्या संख्येनं मराठीजनांनी आज (शनिवार) सजून-धजून अक्षरश: दिवाळी साजरी केली. निमित्त होतं ९५ व्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं निघालेल्या भव्य, नाट्यदिंडीचं!
भांधुर गल्लीतलं मरगाई मंदिर हे बेळगावचं ग्रामदैवत. या ठिकाणी पालखीचं पूजन करून सकाळी सव्वासात वाजता दिंडीला प्रारंभ झाला आणि शिंग-तुताऱ्यांचा निनाद आभाळाला भिडला. दिंडीच्या अग्रभागी सजविलेली बैलजोडी होती. बैलांच्या शिंगांवर केलेल्या सजावटीत छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि संभाजीराजेंची चित्रं लावली होती. पारंपरिक पोषाखातील पुरुषांनी बारा आब्दागिऱ्या हाती घेऊन दिंडीला शोभा आणली. त्यांच्यापाठोपाठ बैलगाडीतून सनई-चौघडा होता. त्यामागे पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी मंगल कलश घेतले होते.
बहुरंगी, बहुढंगी वाद्यवृंदांसोबत नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि अन्य पदाधिकारी चालत होते. त्यामागे प्रज्वलित केलेली शिवज्योत आणि पालखी होती. खास सजविलेल्या रथात संमेलनाध्यक्षा फय्याज शेख आणि मावळते संमेलनाध्यक्ष अरुण काकडे विराजमान झाले होते.
दिंडीतील सुमारे दीडशे वारकऱ्यांचे पथक टाळ-मृदंगाच्या निनादात अभंग गात होते. लाठी-काठी-बोथाटी, मर्दानी खेळ, युद्धसराव, करेल, तलवारबाजी, दांडपट्टा, आदींची प्रात्यक्षिके जागोजागी करण्यात येत होती.
चौकाचौकांत चित्ररथ तयार होते. त्या-त्या चौकात चित्ररथ दिंडीत सहभागी होत होते. चित्ररथांमध्ये ऐतिहासिक पात्रे आणि पारंपरिक वेशभूषा केलेल्या कलावंतांचा समावेश होता. अरुंद गल्ल्या ओलांडून दिंडी कपिलेश्वर रस्त्यावर आली. तेथून तहसीलदार गल्ली, हेमू कॉलनी चौक, रामलिंग खिंड गल्लीमार्गे दिंडी किर्लोस्कर रस्त्यावर आली. तेथून धर्मवीर संभाजी चौक, क्लब रोड, कॉलेज रस्त्यावरून दिंडी बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत दाखल झाली.
५८ पैकी ३२ मराठी नगरसेवक असलेल्या बेळगाव नगरीचे प्रथम नागरिक महेश नाईक, उपमहापौर रेणू मुतगेकर, किरण ठाकूर, नगरसेवक संजय शिंदे, मोहन बेळगुंदकर, रूपा नेसरकर, वैशाली हुलजी, शिवाजी कुंडुनकर आणि अन्य नगरसेवक दिंडीत सहभागी झाले होते.
याखेरीज बेळगाव चेंबर आॅफ कॉमर्सचे सतीश तेंडुलकर, टी. के. पाटील, रेणू किल्लेदार, बाळासाहेब काकतकर, किरण जाधव,
शिवाजी हांडे, अशोक याळगी, अप्पासाहेब गुरव, आदी मान्यवर दिंडीत उपस्थित होते.

नाट्यदिंडीत मोहन जोशींव्यतिरिक्त पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे, पुष्कर श्रोत्री, रमेश भाटकर, डॉ. गिरीश ओक, अलका कुबल-आठल्ये असे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

जागोजागी त्यांना पाहण्यासाठी
आणि त्यांच्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी बेळगावकरांची गर्दी
होत होती.
स्मार्टफोनच्या प्रसारामुळे सेलिब्रिटींसोबत ‘सेल्फी’ काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती.

सव्वाशे वर्षांपूर्वीचा बँड
दिंडीत सहभागी झालेला बसवण्णा बँड सव्वाशे वर्षांपूर्वीचा आहे. बँडवर कल्पनाही करता येणार नाही, अशी गाणी कलावंत वाजवीत होते. यात महाराष्ट्र गीताबरोबरच ‘अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती’ अशी जुनी गीतं आणि ‘नारायणा रमारमणा’ अशी अवघड नाट्यगीतंही कलावंत वाजवीत होते. दोन आवाजात गाणारा कलावंत खुबीनं गाणी गात होता. अत्यंत तयारीचा ‘ब्रास सेक्शन’ हे या बँडचं आणखी एक वैशिष्ट्य.
पोलिसांचे चेहरे तणावग्रस्त
या सर्व उत्सवी वातावरणात तणावग्रस्त दिसत होते ते पोलीस. एकीकडे जहाल मराठी गटाचे मनसुबे आणि दुसरीकडे ‘कन्नड रक्षण वेदिके’चा संभाव्य प्रतिसाद पोलीस सातत्याने तपासत होते. पोलिसांचे मोबाईल, वॉकी-टॉकी आणि बिनतारी संदेश यंत्रणेच्या माध्यमातून सातत्याने संदेश दिले-घेतले जात होते.

महिलांचे ढोल-झांजपथक हे दिंडीचं प्रमुख आकर्षण होतं. सुमारे साडेआठ ते नऊ किलोमीटरच्या पालखीमार्गावर न थकता या महिलांनी सादरीकरण केलं.
 बेळगावातील गल्लोगल्ली महिलांनी भल्या पहाटे उठून घरासमोर सडारांगोळ्या घातल्या होत्या. त्यामुळे दिवाळीसारखीच वातावरणनिर्मिती झाली होती.
अनेक चौकांत कार्यकर्ते पाणी घेऊन उभे होते. दिंडीतील थकलेल्या, उन्हाने शिणलेल्या सहभागींना ते पाणी देत होते. काही ठिकाणी तर बशीत गूळही ठेवला होता.
 दिंडीत सर्वांत शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा आणि नटराजाची सुमारे १५ फूट उंचीची प्रतिमा होती. दिंडीनंतर ती मुख्य रंगमंचावर ठेवण्यात आली.
दिंडी मार्गावर अनेक मराठी मंडळे आणि संस्थांनी मराठीपणाचा अभिमान सांगणारे फलक लावले होते. ठिकठिकाणी ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या.
 मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखविणाऱ्या युवकांनी काही ठिकाणी युद्धाची प्रात्यक्षिकेही सादर केली. ढाल-तलवार घेऊन अनेक व्यक्तींची एकाच वेळी लढाईची प्रात्यक्षिके झाली.

 

Web Title: Rastarasti 'Maharashtra My' in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.