अनाथ मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: August 6, 2016 02:54 IST2016-08-06T02:54:17+5:302016-08-06T02:54:17+5:30

आईच्या हत्येच्या प्रकरणात बाप तुरुंगात असल्याने अनाथ झालेल्या १४ वर्षांच्या मुलीचा सांभाळ आजीच करीत होती.

Rape of orphan girl | अनाथ मुलीवर बलात्कार

अनाथ मुलीवर बलात्कार


तलासरी : आईच्या हत्येच्या प्रकरणात बाप तुरुंगात असल्याने अनाथ झालेल्या १४ वर्षांच्या मुलीचा सांभाळ आजीच करीत होती. मात्र, सख्ख्या मावशीच्या नवऱ्यानेच तिचे वारंवार शोषण केल्याने ती गरोदर राहिली. हा प्रकार जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर शालेय तपासणीमध्ये उघड झाल्याने आरोपी पास्कल जमना मासमार (४०) यास अटक करण्यात आली आहे.
तलासरी पोलीस स्टेशनांतर्गत डहाणू तालुक्यातील मौजे धुंदलवाडी खडकीपाडा येथील ही आदिवासी मुलगी धुंदलवाडीच्या जवळ असलेल्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे. या अनाथ झालेल्या मुलीवर तिच्या मावशीच्या नवऱ्याचीच वाईट नजर होती. संधी मिळेल तेव्हा तो पीडित मुलीचे शारीरिक शोषण करीत होता. वसतिगृहात राहून शिक्षण घेणारी ही मुलगी मे महिन्याच्या सुटीत घरी आल्यावर मावशीच्या नवऱ्याने आजी घरात नसल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. यातून ती गरोदर राहिली.
जून महिन्यात शाळा वसतिगृह सुरू झाल्यानंतर नियमाप्रमाणे वसतिगृहातील मुलींची शारीरिक तपासणी करण्यात आली. त्यात ती गरोदर असल्याचे उघड झाले. तेव्हा शिक्षकांनी विचारपूस केली असता तिने झालेला प्रकार सर्वांना सांगितला. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात येऊन अत्याचार करणाऱ्या पास्कल जमना मासमार यास अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Rape of orphan girl