राणीबाग दर्शन महागले!
By Admin | Updated: July 7, 2017 04:49 IST2017-07-07T04:49:21+5:302017-07-07T04:49:21+5:30
राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या वादग्रस्त प्रस्तावावर महापालिकेच्या महासभेने आज शिक्कामोर्तब केले. या दरवाढीला

राणीबाग दर्शन महागले!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या वादग्रस्त प्रस्तावावर महापालिकेच्या महासभेने आज शिक्कामोर्तब केले. या दरवाढीला भाजपाचा विरोध असल्याने सभागृहात वादळी चर्चा होईल, असे अपेक्षित होते. मात्र हा प्रस्ताव सभेपुढे मंजुरीसाठी आला तरी भाजपा नगरसेवक गाफीलच राहिले. ‘पहारेकऱ्यांच्या’ या डुलकीचा फायदा उठवत शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यानुसार १ आॅगस्टपासून राणीबाग व पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांना सहकुटुंब जायचे असल्यास शंभर रुपये मोजावे लागणार आहेत.
राणीबागेचे प्रवेश शुल्क १९९६ नंतर २००३ मध्ये वाढवण्यात आले. मात्र त्यानंतरही मुलांसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी पाच रुपये दर होते. पेंग्विन आणल्यानंतर राणीबागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र या प्रस्तावाला सर्वच स्तरांतून विरोध सुरू झाला. राजकीयच नव्हे तर माजी सनदी अधिकाऱ्यांनीही या दरवाढीवर आक्षेप घेतला. मात्र या प्रस्तावाला भाजपाकडून खो घातला जाण्याची दाट शक्यता असल्याने शिवसेना धास्तावली होती.
दरवाढीच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या तसेच बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. शिवसेनेच्या खेळीमुळे भाजपाला हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत रोखता आला नाही. उपसूचना मांडून हा प्रस्ताव लटकावण्याचेही भाजपाला सुचले नाही.
त्यामुळे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपा आणि समाजवादी पक्षाने सभात्याग केला होता. महापालिका सभागृहात भाजपा आक्रमक भूमिका घेईल, असे बोलले जात होते. मात्र भाजपाचा विरोध फुसका बारच ठरला. भाजपाला विरोध करण्याची संधी मिळण्याआधीच शिवसेनेने राणीबाग प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
कधीपासून दरवाढ?
महापालिका महासभेच्या मंजुरीनंतर दुसऱ्या महिन्यात म्हणजेच १ आॅगस्टपासून राणीबागेच्या शुल्कात वाढ होईल.
पेंग्विन आणल्यापासून दररोज १५ ते २० हजार पर्यटक राणीबागेत येत आहेत. सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३५ हजारांपर्यंत पोहोचतो, असा पालिकेचा दावा आहे. मात्र राणीच्या बागेत फार पूर्वीपासून दररोज आठ ते दहा हजार पर्यटक येत असतात, असे सामाजिक संस्थांनी निदर्शनास आणले आहे.
सभागृहात सतर्क असल्याचा दावा करणाऱ्या भाजपा नगरसेवकांना नेमकी याच प्रस्तावावेळी डुलकी लागली. हीच संधी साधून सेनेने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मात्र प्रस्तावाला विरोध करण्यास आम्ही बोलण्याची संधी मागितली होती. मात्र ती देण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी दिले.
राणीबाग प्रवेश, पेंग्विन
दर्शनासाठी एकत्रित शुल्क
१२ वर्षांवरील व्यक्तींसाठी :
१०० रुपयांऐवजी ५० रुपये
तीन ते १२ वयोगटातील
मुलांसाठी : २५ रुपये
कुटुंबासाठी : दोन प्रौढ व तीन ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १०० रुपये
अतिरिक्त प्रत्येक तीन वर्षांवरील मुलांसाठी २५ रुपये
शालेय विद्यार्थ्यांसाठी
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : नि:शुल्क
खासगी शाळांतील तीन ते १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी : १५ रुपये
खासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहलीसाठी : २५ रुपये
सकाळी सहा ते आठपर्यंत चालण्यासाठी : मासिक १५० रुपये. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंद.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : नि:शुल्क
फोटोग्राफी पेंग्विन वगळता : १०० रुपये
व्हिडीओ शूटिंग पेंग्विन वगळता : ३०० रुपये
परदेशी पर्यटकांसाठी : १२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४०० रुपये, तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : २०० रुपये