रामझुल्याचे काम नॉनस्टॉप
By Admin | Updated: July 18, 2014 01:25 IST2014-07-18T01:25:45+5:302014-07-18T01:25:45+5:30
शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘रामझुला’ रेल्वे ओव्हरब्रिज प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. एकीकडे रामझुल्याच्या बांधकामासाठी मध्य रेल्वे आवश्यकतेनुसार ‘ब्लॉक’ उपलब्ध

रामझुल्याचे काम नॉनस्टॉप
मिळत राहतील ‘ब्लॉक’ : ३० सप्टेंबर नवीन डेडलाईन
नागपूर : शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘रामझुला’ रेल्वे ओव्हरब्रिज प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. एकीकडे रामझुल्याच्या बांधकामासाठी मध्य रेल्वे आवश्यकतेनुसार ‘ब्लॉक’ उपलब्ध करून देण्यास तयार झाले आहे तर सप्टेंबरच्या शेवटपर्यंत रामझुल्याचे बांधकाम पूर्ण करून आॅक्टोबरपासून रामझुला वाहतुकीसाठी खुला करण्याचा दावा एमएसआरडीसी करीत आहे.
मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंह यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, रामझुल्याच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाला ब्लॉक देण्यासाठी कुठलीही अडचण नाही. प्राथमिकतेनुसार वेळोवेळी ब्लॉक दिले जातील. यासाठी मध्य रेल्वेला मुख्यालयाकडून मंजुरी घेण्याची आवश्यकता पडणार नाही.
‘रेल्वे ब्लॉक’ म्हणजे निश्चित वेळेसाठी संबंधित रेल्वे रुळावरून रेल्वेगाड्यांची ये-जा थांबविणे होय. जेणेकरून संबंधित प्रकल्पाचे बांधकाम कुठल्याही अडचणी शिवाय करता येऊ शकेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) कार्यकारी अभियंता समय निकोसे यांच्यानुसार नवीन डेडलाईननुसार रामझुल्याचे बांधकाम येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. कंत्राटदार कंपनी ‘एफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ला सुद्धा तसे निर्देश देण्यात आलेले आहेत.
आतापर्यंत रामझुल्याचे ४४ केबल्स लागले आहेत. अजून १० केबल्स टाकण्याचे काम शिल्लक आहे. येत्या काही दिवसात रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील रामझुल्याचे काही काम शिल्लक राहिले आहे. त्यासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेतला जात आहे. रेल्वे ब्लॉक, फंड, केबल, मटेरियल सर्व काही उपलब्ध आहे. आता केवळ काम तातडीने पूर्ण करायचे आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)द्वारा एफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरल कंपनीमार्फत रामझुल्याचे काम सुरू आहे. २५ जानेवारी २००६ रोजी याचे ‘वर्क आॅर्डर’ काढण्यात आले होते. पूल दोन वर्षात बनणार होता. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे रामझुल्याच्या बांधकामाचा खर्च वाढून ८४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. (प्रतिनिधी)
जुना पूल नोव्हेंबरपासून हटणार
एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता समय निकोसे यांच्यानुसार रामझुल्याच्या पहिल्या चरणांतर्गत थ्री लेनचे काम पूर्ण करण्यात येईल. आॅक्टोबरमध्ये रामझुला वाहतुकीसाठी खुला केला जाईल. त्यानंतर नोव्हेंबरपासून जुना पूल हटविण्याच्या कामाला सुरुवात होईल. तेव्हासुद्धा रेल्वेकडून ‘ब्लॉक’ची आवश्यकता पडेल. रेल्वेकडून ब्लॉकसाठी सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या चरणातील पुलाचे काम सुरू करण्यासाठी आणि सध्याचा जुना पूल हटविण्यासाठी कमिश्नर आॅफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) ची आवश्यक मंजुरीसुद्धा घेण्यात आलेली आहे.