रमेश कदम यांच्या चुलत बहिणीस अटक
By Admin | Updated: July 22, 2015 00:48 IST2015-07-22T00:48:26+5:302015-07-22T00:48:26+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांची चुलत

रमेश कदम यांच्या चुलत बहिणीस अटक
मुंबई/पुणे/सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांची चुलत बहीण लक्ष्मी महादू लोखंडे (४५, रा. दत्तनगर, खंडाळी, ता. माळशिरस) हिला सोलापूरच्या सीआयडी पथकाने मंगळवारी सकाळी तिच्या राहत्या घरी अटक केली.
महामंडळातील ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. तीन दिवसांपूर्वी सीआयडीने कदम आणि इतरांवर गुन्हे दाखल केले. त्यात लक्ष्मी लोखंडे हिचाही समावेश होता. स्वत: कदम अजूनही फरारी असून, सीआयडी त्यांच्या मागावर आहे.
दरम्यान, सीआयडीच्या कोकण विभागाच्या पोलीस अधीक्षक पौर्णिमा गायकवाड यांनी लक्ष्मी लोखंडेला ताब्यात घेण्याचे आदेश दिले . पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लक्ष्मीला ताब्यात घेऊन सीआयडीकडे तिला सुपूर्द करण्यात आले. दुसरीकडे, रमेश कदम यांची बहीण नकुशा कदम हिला सीआयडीच्या पथकाने पुण्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले. सीआयडीच्या पथकाने सकाळी दहाच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी अनंतराव शिंदे यांनी या माहितीस दुजोरा दिला. नकुशा कदम यांना अटक केली गेल्यास त्याबाबतची माहिती सीआयडीने सहकारनगर पोलीस ठाण्यास कळविणे आवश्यक आहे. याबाबत सायंकाळपर्यंत कळविण्यात आले नसल्याचे या ठाण्याच्या सूत्रांनी स्पष्ट केले.