वनौषधींच्या विक्रीसाठी रामदेवबाबांना साकडे!
By Admin | Updated: January 21, 2016 03:50 IST2016-01-21T03:50:42+5:302016-01-21T03:50:42+5:30
आदिवासींनी संकलित केलेल्या वनोपजांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या वनौषधींना व्यापक बाजारपेठ मिळावी, यासाठी पतंजलीच्या दुकानांमधून या वस्तू विक्रीस ठेवल्या जाव्यात

वनौषधींच्या विक्रीसाठी रामदेवबाबांना साकडे!
मुंबई : आदिवासींनी संकलित केलेल्या वनोपजांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या वनौषधींना व्यापक बाजारपेठ मिळावी, यासाठी पतंजलीच्या दुकानांमधून या वस्तू विक्रीस ठेवल्या जाव्यात, असे साकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रामदेवबाबांना घातले आहे.
आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा, त्यातून त्यांची जीवनोन्नती व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आपण रामदेवबाबा यांची भेट घेतल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. रामदेव बाबांनी मध, कोरफड जेल, आवळा यासारख्या वस्तू खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. यासंबंधीच्या अटी आणि शर्ती निश्चित झाल्यानंतर लवकरच वनविभाग आणि पतंजली उद्योग समूह यांच्यात सामंजस्य करार केला जाईल, ज्यातून पतंजली उद्योगसमूह या वनधनापोटी निश्चित रक्कम वनविभागास प्रदान करील, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
रामदेव बाबांनी वनधनाच्या विक्रीतून कमीत कमी २० कोटी रुपयांची मासिक उलाढाल होऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला. वनमंत्री म्हणाले की, ‘राज्यातील वनवृत्तामध्ये आदिवासी लोकांचे वास्तव्य असून, त्यांच्याकडून विविध प्रकारचे गौण वनोपज संकलित केले जाते. शासनाने यासाठीच राज्य अर्थसंकल्पात श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेची घोषणा केली होती. आता या योजनेंतर्गत असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून या वनौषधींना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यात येत आहे. आजच्या बैठकीनंतर वनविभाग या विषयाचा पाठपुरावा करणार असून, भविष्यात यासंबंधीची पतंजली समूहाबरोबरची दुसरी बैठक हरिद्वार येथे होणार आहे.’
वनमंत्र्यांनी हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ३ जुलै रोजी राज्यात एकाच वेळी २ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना आखल्याची माहिती रामदेव बाबांना दिली. यावर बाबांनी या कामासाठी ३ लाख स्वयंसेवकांची सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले. हरिद्वारच्या धर्तीवर नागपूर येथे सर्वात मोठे फूड पार्क सुरू करणार असल्याची माहिती ही रामदेव बाबांनी यावेळी दिली.