Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: शिवसेनाप्रमुखांसोबत जे नेते होते, त्यांना आयुष्यातून, राजकारणातून कायमचे उद्ध्वस्त करण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केले. त्यामुळे दररोज आता उद्धव ठाकरे उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसतील. मनोहर जोशींची अवस्था काय केली? मनोहर जोशींचे शिवसेना मोठी करण्यात योगदान नव्हते का? अशी अनेक उदाहरणे आहेत. माझेही मंत्रिपद काढून आपल्या मुलाला आदित्य ठाकरेंना दिले. मलाही घरी बसवले. एकनाथ शिंदे बाजूला का निघून गेले? अशी विचारणा करत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला होता. मी उघडपणे सांगतो आहे की शिवसेना यूबीटी वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहे. जी काय दुसरी आहे ती गद्दार सेना आहे. ती गद्दार एसंशि सेना आहे. सत्य हे सत्यच असते. गावागावात ५० खोके एकदम ओके म्हणत होते, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. याला रामदास कदम यांनी उत्तर दिले.
...तर उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांचे नाव घ्यायचा नैतिक अधिकार नाही
जे पाप उद्धव ठाकरेंनी केले आहे, त्याची फळे त्यांना भोगावीच लागतील. खरी शिवसेना शिवसेनाप्रमुखांची आहे, एकनाथ शिंदेंची आहे. खरी शिवसेना आमचीच आहे. काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री बनून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना काळिमा फासल्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता राजकारणासाठी शिवसेनाप्रमुखांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही, हे महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. नवीन सांगायची आवश्यकता नाही, असे रामदास कदम म्हणाले.
दरम्यान, पांचाली, मोर्या ही गँग आदित्य ठाकरेंसोबत कशी काय आली? त्यांचा तर राजकारणाशी काही संबंध नाही. आदित्य ठाकरेंचे रात्रीचे नेमके धंदे काय होते? मुलाला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केले आहेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. किशोरी पेडणेकर नेहमी दिशा सालियन प्रकरणात घरी का जायच्या? याचाही तपास होणे गरजेचे आहे. दिशा सालियनच्या वडिलांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी होत असेल तर आदित्य ठाकरेंचीही नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी या प्रकरणात रामदास कदम यांनी केली आहे.