Ramdas Kadam: "रामदासभाई, तुम्हाला निवृत्त होता येणार नाही; आता सेकंड इनिंगची जोरदार सुरुवात करा"- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 10:03 IST2022-05-13T09:58:41+5:302022-05-13T10:03:58+5:30
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना पक्षात सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कदमांचे पुनर्वसन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ramdas Kadam: "रामदासभाई, तुम्हाला निवृत्त होता येणार नाही; आता सेकंड इनिंगची जोरदार सुरुवात करा"- एकनाथ शिंदे
रत्नागिरी: शिवसेनेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा गेल्या काही महिन्यांपासून पक्षासोबत दुरावा निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Tahckeray) यांच्या नाराजीमुळे रामदास कदम पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमात दिसत नाहीत. पण, आता कदमांचे पुनर्वसन होण्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
'तुम्हाला निवृत्त होता येणार नाही'
रामदास कदम यांनी लिहलेल्या 'जागर कदम वंशाचा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. यावळी शिदेंनी कदमांना पक्षात सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. "रामदासभाई तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते आहेत. तुम्हाला निवृत्त होता येणार नाही. आपली चांगली टीम आहे, समाजाला आपली गरज आहे. पक्षासाठी आणि समाजाच्या हितासाठी आपण स्वतःला झोकून देत काम केले आहे.''
'सेकंड इनिंगची तयारी करा'
''आपले पुत्र आमदार योगेश कदम मतदारसंघात चांगलं काम करत आहेत. त्यांना जिथे जिथे निधी लागेल तिथे निधी देण्यासाठी आपण कमी पडणार नाही. भाई आपण केवळ पुस्तके लिहण्याचा विचार करू नका. आता आपल्याला प्रवाहामध्ये राहायचं आहे. आता आपण आपल्या सेकंड इनिंगची जोरदार सुरुवात करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत", असे मोठे विधान एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे रामदास कदम यांचे पुनर्वसन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सभेसाठी रामदास कदमांना निमंत्रण, पण जाणार नाहीत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे मनसे आणि भाजपकडून होत असलेल्या राजकीय हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार आहेत. या सभेसाठी रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंकडून निमंत्रण मिळाले आहे. रामदास कदम यांनी स्वतः उद्धव ठाकरेंचा निरोप मिळाल्याचे सांगितले. पण, कदम सभेसाठी जाणार नाहीत. ते सभेनंतर उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचे कदमांनी सष्ट केले.
उद्धव ठाकरेंच्या नाराजीचे कारण काय ?
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एका ऑडिओ क्लिपमुळे कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज झाल्याचे सांगितले जात होते. रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिल्याची चर्चा होती. मात्र, रामदास कदम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.